जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या २८ जुलैपासून ‘ऑफलाइन’ बदल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:25 AM2020-07-18T10:25:01+5:302020-07-18T10:25:11+5:30
शिक्षकांच्या ‘ऑफलाइन’ बदल्या करण्याची प्रक्रिया २८ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहेत.
अकोला : जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ‘ऑफलाइन’ बदल्या करण्याची प्रक्रिया २८ जुलैपासून सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांच्या याद्या सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना (बीईओ) दिले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची सार्वत्रिक बदली प्रक्रिया दरवर्षी मे महिन्यात राबविण्यात येते; मात्र यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया लांबणीवर पडली होती. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या ऑनलाइन न करता, आॅफलाइन पद्धतीने करण्याचे निर्देश शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत १५ जुलै रोजी देण्यात आलेले निर्देश जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑफलाइन बदल्या करण्याची प्रक्रिया २८ ते ३१ जुलैदरम्यान जिल्हा परिषद प्रशासनामार्फत राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील कार्यरत प्राथमिक शिक्षकांपैकी बदलीपात्र व बदली अधिकारी पात्र प्राथमिक शिक्षकांच्या याद्या २१ जुलैपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी १७ जुलै रोजी जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटशिक्षणाधिकाºयांना पत्राव्दारे दिले आहेत.
शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे असे आहे वेळापत्रक!
जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील बदलीपात्र शिक्षकांची माहिती २२ जुलै रोजी जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार असून, बदलीपात्र शिक्षकांची तात्पुरती यादी शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २४ ते २६ जुलैपर्यंत बदलीपात्र शिक्षकांच्या यादीवर आक्षेप घेता येतील. आक्षेप दुरुस्तीनंतर २७ जुलै रोजी बदलीपात्र शिक्षकांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, २८ ते ३१ जुलैदरम्यान प्रत्यक्ष बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.