जिल्हा परिषद उपाध्यक्षांना बांधकाम, शिक्षण सभापतींना आरोग्य खाते मिळणार!
By संतोष येलकर | Published: November 30, 2023 06:16 PM2023-11-30T18:16:18+5:302023-11-30T18:16:58+5:30
अकोला : जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सुनील फाटकर यांना बांधकाम आणि शिक्षण, सभापती माया नाईक यांना आरोग्य ...
अकोला : जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सुनील फाटकर यांना बांधकाम आणि शिक्षण, सभापती माया नाईक यांना आरोग्य खाते मिळणार आहे. येत्या १९ डिसेंबर रोजी आयोजित जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत संबंधित दोन समित्यांच्या सभापतीपदांचा प्रभार उपाध्यक्ष आणि शिक्षण सभापतींकडे सोपविण्यात येणार आहे.
गतवर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापतींची निवड झाल्यानंतर विषय समित्यांच्या सभापतींचे खातेवाटप करण्यात आले होते. त्यामध्ये उपाध्यक्ष सुनील फाटकर यांच्याकडे अर्थ, सभापती आम्रपाली खंडारे यांच्याकडे समाजकल्याण, सभापती रिजवाना परवीन यांच्याकडे महिला व बालकल्याण आणि सभापती योगिता रोकडे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदाचा प्रभार देण्यात आला.
शिक्षण व आरोग्य या दोन खात्यांच्या सभापतीपदांचा अतिरिक्त प्रभार जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्याकडे राखून ठेवण्यात आला होता. अध्यक्षांकडील हा अतिरिक्त प्रभार आता उपाध्यक्ष आणि शिक्षण सभापतींकडे देण्याचे सत्तापक्षाकडून निश्चित करण्यात आले आहे.त्यामध्ये उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सुनील फाटकर यांना बांधकाम आणि शिक्षण सभापती माया नाईक यांना आरोग्य खाते देण्यात येणार असून, संबंधित दोन समित्यांच्या सभापतीपदांचा प्रभार येत्या १९ डिसेंबर रोजी आयोजित जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.
वर्षभरापासून अध्यक्षांकडे दोन समित्यांचा अतिरिक्त प्रभार!
वर्षभरापासून जिल्हा परिषद अध्यक्षांकडे असलेल्या शिक्षण व आरोग्य या दोन समित्यांच्या सभापतीपदांचा अतिरिक्त प्रभार उपाध्यक्ष व शिक्षण सभापतींकडे सोपविण्याची तयारी जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाकडून सुरू करण्यात आली.
माझ्याकडे असलेल्या अतिरिक्त दोन खात्यांपैकी बांधकाम समितीचा प्रभार जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे आणि आरोग्य समितीचा प्रभार शिक्षण सभापतींकडे सोपविण्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मी दिले आहे. तसेच १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत हा विषय घेण्यात आला आहे.
संगीता अढाऊ
अध्यक्ष, जिल्हा परिषद