दोन वर्षांत शाळा जिल्हा परिषदेच्या १५ शाळा पडल्या बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 01:23 PM2019-03-17T13:23:47+5:302019-03-17T13:23:54+5:30
अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये काही गावांतील विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने त्या बंद करण्याची वेळ आली. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील १५ शाळा बंद पडल्या असून, त्या सुरू करण्यासाठी कर्मचारी संघटना सरसावल्या आहेत.
अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये काही गावांतील विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने त्या बंद करण्याची वेळ आली. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील १५ शाळा बंद पडल्या असून, त्या सुरू करण्यासाठी कर्मचारी संघटना सरसावल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकत्याच झालेल्या बैठकीचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले आहे.
ग्रामीण भागात कॉन्व्हेंट संस्कृतीचे लोण पोहोचले, तसेच वाहतुकीची साधने वाढल्याने शहर, ग्रामीण भागाचे अंतर कमी झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्रासपणे शहरी भागातील शाळांमध्ये दाखल होत आहेत. त्यातच जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचा दर्जाही घसरला. त्याचाही परिणाम, शाळांतील विद्यार्थी प्रवेशावर होत आहे. काही गावांची लोकसंख्याही कमीच असल्याने २० पर्यंत विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या सर्व बाबींच्या परिणामी, २०१७ ते आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या १५ शाळा बंद करून इतर शाळांमध्ये जोडण्यात आल्या. त्या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लगतच्या शाळेत धाव घ्यावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या संचमान्यतेनुसार शिक्षकांची पदेही घटली आहेत. याबाबतची माहिती पुन्हा शासनाने मागविल्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पाठविली आहे.
- गरिबांचे शिक्षण, शिक्षकांची पदे वाचवा!
मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कास्ट्राइब कर्मचारी संघटनेसोबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेने बंद केलेल्या शाळांचा मुद्दा उपस्थित केला. त्यामध्ये जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने शाळांना कुलूप लावण्यात आले. शाळांमध्ये विद्यार्थी घडत असतात म्हणून त्या सुरू ठेवाव्या, अशी मागणी केली. बैठकीला कास्ट्राइब संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ उपस्थित होते. त्या इतिवृत्तानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला पत्र देत कार्यवाही करण्याचे सांगितले आहे.
- बंद पडलेल्या प्राथमिक शाळा
कमी पटसंख्येमुळे बंद पडलेल्या शाळांची संख्या जिल्ह्यात १५ आहे. त्यापैकी काही शाळांतील विद्यार्थी संख्या शून्य ते १० पर्यंत आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा सोनाळा-०८, साहित-०८, मालपुरा-७, लखमापूर-१०, मोझरी-४, उर्दू शाळा जामठी बु.-३, ठोकबर्डी-७, अडोशी-१०, वणी-४, कवठा खुर्द-६, सर्व विद्यार्थी संख्या शून्य असलेल्या शाळांमध्ये राजापूर, एडली, व्याळा उर्दू, खांबोरा गावांचा समावेश आहे.