जिल्हा परिषदांचा अखर्चित निधी होणार शासनजमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2016 01:32 AM2016-05-24T01:32:38+5:302016-05-24T01:32:38+5:30
अमरावती विभागातील पाच जिल्हा परिषदांकडील निधीचा समावेश
संतोष येलकर / अकोला
जिल्हा परिषदांकडील आस्थापना व आस्थापनेत्तर अखर्चित निधी शासन खाती जमा करण्याचे निर्देश शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत १३ मे रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार देण्यात आले आहेत. त्यानुसार अमरावती विभागातील पाचही जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांचा अखर्चित निधी शासनाकडे जमा करण्यात येणार आहे.
राज्य विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने साक्षीच्या वेळी निधी खर्च न करणार्या व अखर्चित रक्कम शासनाच्या खात्यात जमा न करणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांकडील अखर्चित निधी शासनाच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना ग्राम विकास विभागामार्फत परिपत्रकाद्वारे राज्यातील जिल्हा परिषदांना दिल्या आहेत. त्यानुसार शासनाच्या संबंधित विभागाकडून जिल्हा परिषदांना प्राप्त झालेला आस्थापनाविषयक अखर्चित निधी तातडीने शासनाच्या खात्यात जमा करावा लागणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वेतनाचा निधी, निरंतर पाणीपुरवठा व समाजकल्याण विभागाकडून प्राप्त आस्थापनाविषयक निधीचा समावेश आहे तसेच जिल्हा परिषदांना विविध योजना राबविण्यासाठी प्राप्त झालेला निधी त्या आर्थिक वर्षात खर्च झाला नसल्यास, अखर्चित निधी पुढील आर्थिक वर्षात खर्च करण्यास मान्यता आहे; परंतु संबंधित निधी लगतच्या वर्षीही खर्च झाला नाही, असा अखर्चित निधी शासनाच्या संबंधित विभागाकडे तातडीने जमा करण्याच्या सूचना शासनामार्फत जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह संबंधित विभागाच्या अधिकार्यांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यानुसार अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांकडील अखर्चित निधी शासनाच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.