अखेर जिल्हा परिषदेचे आरक्षण ठरले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 01:46 PM2019-05-18T13:46:57+5:302019-05-18T13:48:47+5:30
सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेसह नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासह महिलांसाठी आरक्षित जागांच्या प्रक्रियेला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.
अकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेसह नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासह महिलांसाठी आरक्षित जागांच्या प्रक्रियेला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार एकूण ५३ मतदारसंघांसाठीचे आरक्षण घोषित करण्यात आले असून, अनुसूचित जातीसाठी १२, अनुसूचित जमातीसाठी ५, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (नामाप्र) १४ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी २२ गट आरक्षित करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या ५३ गटांच्या आरक्षणात सर्व संबंधित प्रवर्गातील महिलांसाठी ५३ पैकी २७ गट राखीव करण्यात आले. जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघांची रचना आणि आरक्षण ३० एप्रिल रोजी घोषित करण्यात आले होते. त्यासंदर्भात काही सर्कलबाबत हरकती व सूचना प्रशासनाकडे सादर करण्यात आल्या होत्या. याबाबतची सुनावणी विभागीय आयुक्तांच्या दालनात होऊन आक्षेप फेटाळण्यात आले.
जिल्हा परिषद गटांचे प्रवर्गनिहाय आरक्षण!
१२ अनुसूचित जाती गट : सर्वसाधारण - उगवा, वरूर, राजंदा, भांबेरी, कान्हेरी सरप, सस्ती. स्त्रियांसाठी राखीव- व्याळा, पारस, हातरुण, चांदूर, बोरगाव मंजू, हातगाव.
०५ अनुसूचित जमाती गट : सर्वसाधारण - पिंपळखुटा, जनुना. स्त्रियांसाठी राखीव- अकोली जहागीर, महान, आगर.
१४ नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण - अकोलखेड, लाखपुरी, घुसर, कानशिवणी, अंदुरा, देगाव, शिर्ला. स्त्रियांसाठी राखीव - दानापूर, अडगाव बु., तळेगाव बु., कुटासा, बपोरी, कुरणखेड, दगडपारवा.
अनेकांना झटका
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी राखीव जागा ठरतानाच सामाजिक आरक्षणासह सर्वसाधारण गटांतून महिलांसाठी ५० टक्के राखीव जागा निश्चित झाल्याने जिल्हा परिषदेच्या राजकारणातील अनेक प्रस्थापित, दिग्गज, सत्ताधारी सदस्यांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. काही पदाधिकारी, सदस्यांना त्यांच्याऐवजी पत्नीला राजकारणात आणण्याची संधी महिलांसाठी राखीव गटांमुळे उपलब्ध झाली आहे.