जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे वेतन थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 05:59 PM2020-04-13T17:59:57+5:302020-04-13T18:00:04+5:30
अधिकारी-कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या इतर विभागातील वेतनही थकीत आहे.
अकोला : सद्यस्थितीत देशभरात कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असताना त्यासाठी कार्यरत राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या इतर विभागातील वेतनही थकीत आहे.
एप्रिल महिन्याच्या दुसरा आठवडा उलटला तरीही वेतन न मिळाल्याने शिक्षकांसह कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाºयांच्या वेतनाला दरमहा उशीर होतो. हा प्रकार नेहमीचा आहे. त्यातच शिक्षक, ग्रामसेवकांचे वेतनही कधीच नियमित दिले जात नाही. या परिस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाला. त्यामुळे अनेक विभागातील अधिकारी-कर्मचाºयांनी संबंधितांच्या कार्यालयातील वेतन देयक तयार करण्यास उशीर लावला. तर जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाकडे वेतन देयक आल्यानंतर तेथेही मंजुरीच्या प्रक्रियेतील संबंधितांची उपस्थिती कमी प्रमाणात असल्याने ती देयक तेथेही रखडली. याबाबत शिक्षक संघटना पदाधिकाºयांनी काही अधिकाºयांशी संपर्क केला असता कोरोनामुळे कार्यालयातील उपस्थिती कमी आहे. त्याचा परिणाम कामांवर झाला आहे. वेतन देयकांशी संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित झाल्यानंतर देयकावर पुढील काम केले जाईल, असे सांगितले जात आहे; मात्र त्याचवेळी अत्यावश्यक सेवेत असलेले ग्रामसेवक, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, पाणीपुरवठा विभाग यासह इतरही विभागातील कर्मचाºयांचे मार्च महिन्याचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनांमुळे घरातच बसून राहण्याची वेळ अनेकांवर आली आहे. त्यामुळे घरखर्चासह इतरही बाबींचा खर्च कसा भागवावा, अशी विचारणा आता होत आहे.