जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बूट, टाय, मोजांचे दरच ठरले नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:27 AM2018-03-15T01:27:31+5:302018-03-15T01:27:31+5:30
अकोला : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बूट, टाय, मोजांसह विविध वस्तूचा लाभ देण्यासाठी तरतूद असलेला १ कोटी २० लाखांच्या खर्चाच्या फायलीला अद्याप तांत्रिक मंजुरी मिळालेली नाही. त्याशिवाय, खरेदी समितीने साहित्याचे दरही न ठरवल्याने या वस्तूंचा लाभ विद्यार्थ्यांना मिळतो की नाही, अशीच परिस्थिती सध्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बूट, टाय, मोजांसह विविध वस्तूचा लाभ देण्यासाठी तरतूद असलेला १ कोटी २० लाखांच्या खर्चाच्या फायलीला अद्याप तांत्रिक मंजुरी मिळालेली नाही. त्याशिवाय, खरेदी समितीने साहित्याचे दरही न ठरवल्याने या वस्तूंचा लाभ विद्यार्थ्यांना मिळतो की नाही, अशीच परिस्थिती सध्या आहे.
विद्यार्थ्यांना गणवेशासोबत टाय, बेल्ट, बूट, पायमोेजे, नेमप्लेट वाटप करण्यासाठी जिल्हा परिषदेने लाखो रुपये निधीची तरतूद केली. त्यासोबतच शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर देणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, दिव्यांग कर्मचाºयांना उपकरणे खरेदी, आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंना ट्रॅकसूट देणे, बूट देणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना संगणक प्रशिक्षण देणे, शाळांना टिनपत्र्यासाठी आकस्मिक निधी, शाळा डिजिटल करण्यासाठी संगणक, प्रोजेक्टर, प्रिंटर पुरवणे, प्रथम येणाºया विद्यार्थ्यांचा गौरव करणे, शाळांच्या विद्युत देयकांसाठी अनुदान देणे, शाळांना ब्लॅक बोर्ड पुरवणे, विद्यार्थ्यांना ओळखपत्र देणे, या योजनांसाठीही निधीची तरतूद आहे.
त्यापैकी बूट, पायमोजे, टाय, बेल्टसाठी असलेल्या निधीचे वाटप लाभार्थींच्या खात्यावर करण्यासाठीच्या फायलीला अद्यापही तांत्रिक मंजुरी मिळाली नसल्याची माहिती आहे. त्याशिवाय खरेदी समितीने या साहित्याचे दरही अद्याप निश्चित केले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्या दराने वस्तूचा लाभ मिळणार, हे स्पष्ट झाले नाही. ५० लाखांपेक्षा अधिक निधी असल्याने योजनेला सर्वसाधारण सभेची मंजुरीही घ्यावी लागणार आहे. २२ मार्च रोजीच्या अर्थसंकल्पीय सभेत त्यावर निर्णय होऊ शकतो.
फाइल तांत्रिक मंजुरीसाठी सादर केली आहे. सोबतच खरेदी समितीकडून साहित्याचे दर निश्चिती होणे आवश्यक आहे. त्यानंतर सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार निधी खर्चाची प्रक्रिया सुरू होईल. विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम दिली जाईल.
- प्रशांत दिग्रसकर,
शिक्षणाधिकारी, प्राथमिक
निधी खर्चाच्या ठरावाबाबतच संभ्रम आहे. शिक्षण समितीमध्ये आधी निधी वळता करण्याच्या ठरावाबाबतचा निर्णय होणे आवश्यक आहे. समितीकडून ठराव रद्द झाल्यानंतरच त्याबाबत पुढील निर्णय घेता येईल. तीन महिने तो रद्द करता येत नाही. तांत्रिक अडचण आहे. पुढील वर्षात हा निधी खर्च करण्यासाठी तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांच्या खात्यावर पाच वस्तूच्या वाटपासाठी जास्तीत जास्त २२५ रुपये मिळणार आहेत.
- पुंडलिकराव अरबट, सभापती, शिक्षण.