चांदूर येथील जि.प. शाळेत ‘माय डिजीटल स्कूल’
By admin | Published: August 22, 2015 01:04 AM2015-08-22T01:04:20+5:302015-08-22T01:04:20+5:30
लोकसहभागातून निर्मिती; जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन.
अकोला : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण मिळावे या अनुषंगाने चांदूर येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेत ह्यमाय डिजीटल स्कूलह्णची निर्मिती करण्यात आली. डिजीटल स्कूलचे उद्घाटन जिल्हाधिकारी जि. श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले.
खासगी शाळांच्या तुलनेत आपला विद्यार्थी पिछाडीवर राहू नये या उद्देशाने लोकसहभाग आणि शासकीय निधीतून शाळेत ह्यमाय डिजीटल स्कूलह्णची निर्मिती करण्यात आली आहे. डिजीटल स्कूलमध्ये सुसज्ज संगणक लॅब निर्माण करण्यात आली असून, इयत्ता ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांना खासगी संगणक शिक्षकांच्या सहकार्याने बेसीक शिक्षण व एमएससीआयटी हा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. तसेच वर्ग पहिली ते पाचवी आणि सहावी ते सातवीचा अभ्यासक्रम प्रोजेक्टरच्या साहाय्याने शिकविण्यात येणार आहे.
डिजीटल स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी इयत्ता पहिली इंग्रजी माध्यम आणि इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना डिजीटल क्लासमध्ये प्रात्यक्षिक शिक्षणाचे धडे दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी शहरी शाळांमध्ये गेले आहेत; परंतु डिजीटल स्कूलच्या माध्यमातून असे विद्यार्थी परत येणार असल्याने ही गौरवास्पद बाब असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी जि. श्रीकांत यांनी म्हटले. सूत्रसंचालन सुषमा लांडे यांनी, तर आभार मीनाक्षी सेटे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजसिंह मोहता, प्रकाश अंधारे, संजय साकरकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.