सुरक्षेसाठी अट्टहास

By admin | Published: August 10, 2016 01:12 AM2016-08-10T01:12:09+5:302016-08-10T01:23:12+5:30

महपालिकेच्या खर्चाने वॉर्डात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा नगरसेवकांचा अट्टहास दिसून येतो. विशेष म्हणजे नगरसेवक स्वत:चे निवासस्थान आणि संपर्क कार्यालय या परिसरात कॅमेरे

Zoo for safety | सुरक्षेसाठी अट्टहास

सुरक्षेसाठी अट्टहास

Next

पिंपरी : महपालिकेच्या खर्चाने वॉर्डात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा नगरसेवकांचा अट्टहास दिसून येतो. विशेष म्हणजे नगरसेवक स्वत:चे निवासस्थान आणि संपर्क कार्यालय या परिसरात कॅमेरे बसविण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.
महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेलेले अनेक लोकप्रतिनिधी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. काही जण जमीन खरेदी-विक्री व्यवसायात सक्रिय आहेत. काही बांधकाम व्यावसायिक झाले आहेत. या व्यवसायात काम करताना, लँड माफिया, तसेच अनेकांशी त्यांचा संबंध येतो. गुन्हेगारीशी संबंधित काही नगरसेवक आहेत. अशा प्रकारे विविध क्षेत्रांत संबंध येत असल्याने अनेकांना स्वत:च्या सुरक्षिततेची चिंता वाटू लागते. गुंड प्रकाश चव्हाण याच्या खुनानंतर नगरसेवक अविनाश टेकावडे यांचा खून झाला. टेकावडे यांच्या खुनाच्या घटनेनंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आपण करत असलेली चुकीची कामे कधीही अंगलट येऊ शकतात. कधीही, कोणीही हल्ला करू शकते. या भीतीने काही नगरसेवकांची गाळण उडाली आहे. जसजशी महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तशी त्यांची अधिक घाबरगुंडी उडू लागली असून, त्यांच्याकडून दक्षतेच्या अधिकाधिक उपाययोजना केल्या जात आहेत. एकीकडे छुप्या पद्धतीने गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग, तर दुसरीकडे लोकसेवक म्हणून समाजात वावरायचे, अशा दोन्ही भूमिका वठविण्याचा समतोल राखताना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नगरसेवकांची दमछाक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकावर खुनी हल्ला झाला. त्या वॉर्डात नगरसेवकाने पुढाकार घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू केले होते. हल्लेखोरांनी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होण्याच्या आगोदरच हल्ला केला. (प्रतिनिधी)

झोपडपट्टीतील वॉर्डात हमखास सीसीटीव्ही
पिंपरी आणि चिंचवडमधील झोपडपट्टी परिसरातील वॉर्डात प्रामुख्याने सीसीटीव्ही यंत्रणेचा आग्रह धरला जात आहे. झोपडपट्ट्यांमध्ये भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण अधिक असते. त्यावर नियंत्रण यावे, याकरिता सीसीटीव्ही यंत्रणा लावण्याचा आग्रह असतो. असे तेथील नगरसेवक सांगतात. काहींनी तर पालिकेतर्फे ही यंत्रणा कार्यान्वित होण्याची वाट न पाहता स्वखर्चाने ही यंत्रणा बसविण्यास प्राधान्य दिले आहे.

हालचाल टिपण्यासाठी
केला जातो वापर
लोकप्रतिनिधी म्हणून समाजात वावरणारे स्वत:च्या संपर्क कार्यालयात मात्र चाहोबाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावून बसतात. कार्यालयात
येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची हालचाल टिपली जाते. त्यात कोणी संशयित वाटते का, यावर त्यांची आणि समर्थक कार्यकर्त्यांची नजर कायम भिरभिरत असते. संपर्क कार्यालयात बसून टेबलावरील संगणकाच्या स्क़्रीनवर कार्यालयाबाहेरील परिस्थिती पाहत असतात.

Web Title: Zoo for safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.