ZP Election 2021 : चुलीत गेलं ते मंत्रीपद, राज्यमंत्री बच्चू कडू अमोल मिटकरींवर चांगलेच भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 07:24 PM2021-10-06T19:24:20+5:302021-10-06T20:04:31+5:30
अमोल मिटकरींच्या आरोपानंतर राज्यमंत्री बच्चू कडूंनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. तसेच, चुलीत गेलं ते मंत्रिपद, मी उद्या राजीनामा देऊन फेकतो', असे म्हणत आमदार मिटकरींना चांगलच सुनावलं.
अकोला/मुंबई - अकोला जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत, अकोट तालुक्यातील कुटासा येथील लढत चांगलीच गाजली. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना मोठा धक्का बसला आहे. येथून राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार स्मृती गावंडे विजयी झाल्या आहेत. या निकालानंतर मंत्री बच्चू कडू आणि आमदार मिटकरी यांच्यात चांगलीच जुपल्याचं पाहायला मिळत आहे. मिटकरींच्या आरोपाला उत्तर देताना बच्चू कडूंनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार छबुताई राऊत या त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात होत्या. त्यानंतर, पालकमंत्र्यांनी जी छुपी युती केली, त्याचा महाविकास आघाडी सरकारने विचार करणे आवश्यक आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले होते. अमोल मिटकरींच्या आरोपानंतर राज्यमंत्री बच्चू कडूंनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. तसेच, चुलीत गेलं ते मंत्रिपद, मी उद्या राजीनामा देऊन फेकतो', असे म्हणत आमदार मिटकरींना चांगलच सुनावलं.
चुलीत गेलं ते मंत्रीपद
'मिटकरी हा मोठा माणूस आहे, मी त्याच्याबाबत बोलू शकत नाही. मी आमिषाला बळी पडणारी औलाद नाही. ही माझी संस्कृती नाही. असं काही असेल तर मिटकरींनी सिद्ध करावे. हवेत आरोप कोणीही करू शकतात. मिटकरी हे बरोबर नाही. हे मी सहन नाही करणार. चुलीत गेलं ते मंत्रिपद. आमिषाला बळी पडणं म्हणजे काय असतं? ते मला आधी सांगा. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप सर्वच पक्ष वेगवेगळे लढले आहेत. मी कुठल्या आमिषाला बळी पडलो, ते सिद्ध करा. मी उद्या राजीनामा देऊन फेकतो. मला त्याची गरज नाही', असे बच्चू कडू म्हणाले.
काय म्हणाले होते मिटकरी
प्रहार पक्षाला 78 मतं आहेत, राष्ट्रवादीला 978 मत आहेत. मी स्थानिक विकासकामं केली नसती तर, लोकांनी राष्ट्रवादीलं मत दिलं नसती. भाजपचे आज 1800 मत कमी झाले आहेत, त्याचा फायदा प्रहारला झाला. त्यामुळेच, प्रहार पक्ष निवडणूक जिंकला. काही जागांवर बच्चू कडूंनी स्वबळाचा नारा दिला तरी त्यांना एकच जागा जिंकता आली. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला, त्यांना जागा वाढवता आल्या नाहीत किंवा कमीही करता आल्या नाहीत. राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र लढली, राष्ट्रवादीच्या दोन जागा वाढल्या, वंचितच्या दोन जागा शिवसेनेमुळे कमी झाल्या, तसेच, भाजपच्याही 2 जागा राष्ट्रवादीमुळे कमी झाल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले.
सरकारने गांभीर्याने विचार करावा
अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादीनं चांगलं यश मिळवलंय. माझ्या सर्कलमध्ये पराभव झाला असला, तरी राष्ट्रवादीला २२५० मत आहेत. पालकमंत्र्यांनी भाजपसोबत छुपी युती केली, त्याचा महाविकास आघाडी सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी विनंतीही अमोल मिटकरी यांनी केली आहे. सर्वांनी एकत्र येऊन भाजपला रोखलं पाहिजे, महाविकास आघाडी एकत्र आली नाही, तर आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये, फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये आपल्याला अपयश येऊ शकतं, असे स्पष्ट मत आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं आहे.