जि. प. निवडणूक : भारिप-बमसंच्या यादीवर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 01:06 PM2019-12-23T13:06:41+5:302019-12-23T13:06:55+5:30
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भारिप-बमसंने रविवारी दिवसभर उमेदवारांना शेगाव येथे एबी फॉर्मचे वाटप केले
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भारिप-बमसंने रविवारी दिवसभर उमेदवारांना शेगाव येथे एबी फॉर्मचे वाटप केले. त्याचवेळी पक्षाने रात्री उशिरापर्यंतही पक्षाच्या उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्धीपासून दूरच ठेवली. उमेदवारांनाही एबी फॉर्मबाबत गोपनीयता बाळगण्याचे निर्देश दिले. एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवारांची नावांची माहिती उशिरा हाती आली. त्यापैकी दहा गटांच्या उमेदवारीबद्दल निर्णय न झाल्याने ती नावे पुढे आलेली नाहीत. भारिप-बमसंपासून काही वर्षांपूर्वी दूर गेलेले माजी मंत्री मखराम पवार यांच्या पुत्राला जामवसू गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही जिल्हा परिषद गटात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच बंडखोरी करीत इतर पक्षांची उमेदवारी मिळविल्याचाही प्रकार घडत आहे. काही गटांत पार्सल उमेदवार दिल्यानेही स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
जिल्हा परिषद गटांतून निवडणूक लढण्यासाठी भारिप-बमसंच्या ४३ उमेदवारांच्या नावाची माहिती रात्री उशिरा प्राप्त झाली. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यातील दानापूर गटात आशा भगवान हागे, तळेगाव खुर्द- सौ. अढाऊ, बेलखेड- अॅड. श्रीकांत तायडे, पाथर्डी-अनंत अवचार, दहिगाव- मीरा प्रल्हाद पाचपोर, भांबेरी- प्रतिभा बाबुराव भोजने यांना उमेदवारी मिळाली आहे. हिवरखेड, अडगाव बुद्रूक गटांसाठीची नावे उद्यापर्यंत निश्चित होणार आहे.
अकोट पंचायत समितीमध्ये उमरा गटात प्रशांत मानकर, अकोलखेड- मदन नारायण सावळे, अकोली जहागीर- सुनीता संजय कासदे, आसेगाव बाजार, मुंडगाव- सुश्मिता रमेश सरकटे, कुटासा- शोभा मनोहर शेळके, चोहोट्टा- पंजाबराव वडाळ, वरूर गटाची उमेदवारी अनिर्णित आहे.
मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये लाखपुरी गटात विनोद वाल्मीक नागे, बपोरी- शीतल पंडित वाघमारे, कुरूम- योगिता मोहन रोकडे, माना- श्रीमती शेख मुख्तार मो. साहेब, सिरसो- माया संजय नाईक, हातगाव- प्रतिभा प्रभाकर अवचार, कानडी- वंदना युवराज जोगदंड.
अकोला पंचायत समिती अंतर्गत आगर गटात-आशा रामचंद्र तुंबडे, दहिहांडा- शे. अन्सार सै. सैदू, घुसर- शंकर इंगळे, उगवा- आकाश सिरसाट, बाभूळगाव- ज्ञानेश्वर सुलताने, कुरणखेड- मनीषा सुशांत बोर्डे, कानशिवणी- चंद्रशेखर पांडे गुरुजी, बोरगाव मंजू-वैशाली देवानंद मोहोड, चांदूर- पुष्पा इंगळे, चिखलगाव- अनिर्णित.
बाळापूर पंचायत समितीअंतर्गत हातरुण गटात लीना शेगोकार, निमकर्दा- प्रगती गजानन दांदळे, व्याळा- कमलाबाई दांडगे, पारस- आम्रपाली अविनाश खंडारे, वाडेगाव- श्यामलाल लोध, अंदुरा, देगाव गटाची उमेदवारी अनिर्णित आहे.
बार्शीटाकळी पंचायत समितीअंतर्गत कान्हेरी सरप गटात- राजेंद्र पातोडे, दगडपारवा- मुक्ता सतीश बाबर, पिंजर- कविता राठोड, महान-गुंफा हनुमान वाघमारे, राजंदा- अशोक सिरसाट, जामवसू- सतीश मखराम पवार. जनुना गटातील उमेदवार अनिर्णित आहे.
पातूर पंचायत समितीअंतर्गत चोंढी गटात सावित्री हिरासिंग राठोड, विवरा- विनोद देशमुख, सस्ती- राहुल सरदार, पिंपळखुटा, आलेगाव-सविता गणेश ढोणे यांना उमेदवारी देण्यात आली. शिर्ला गटाबाबत उद्या निर्णय होणार आहे.
पांडे गुरुजी, अवचार, सिरसाट, इंगळे, शेळके रिंगणात
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भारिप-बमसंला सातत्याने समर्थन देणारे चंद्रशेखर पांडे गुरुजी यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात निसटता पराभव झालेल्या प्रतिभा अवचार यांना त्याच मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा इंगळे, माजी सभापती शोभा शेळके, अशोकराव सिरसाट यांना उमेदवारी मिळाली आहे.
‘एबी’ फॉर्म भारिप-बमसंचाच!
विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या नावे लढविल्यानंतर तशी नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी तांत्रिक कारणामुळे पक्षाला वंचित बहुजन आघाडीचे चिन्ह न मिळाल्याने जिल्हा परिषद निवडणूक भारिप-बमसंच्या नावावरच लढविली जात आहे. ४ जानेवारीनंतर त्याबाबतची माहिती आयोगाच्या वेबसाइटवर येण्याची शक्यता आहे.