वाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 01:26 PM2019-03-09T13:26:02+5:302019-03-09T13:26:25+5:30

मंडळाच्या राज्यस्तरीय मूल्यांकन समितीने जिल्ह्यातील १७ पैकी पाच शाळांचे बाह्यमूल्यांकन केले. या मूल्यांकनात वाडेगाव येथील जिल्हा परिषद मुलांची शाळेने बाजी मारली

ZP School at Wadegaon has the status of international school! | वाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा!

वाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा!

googlenewsNext

अकोला: महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या संलग्नतेसाठी जिल्ह्यातील १७ शाळांनी अर्ज केले होते. मंडळाच्या राज्यस्तरीय मूल्यांकन समितीने जिल्ह्यातील १७ पैकी पाच शाळांचे बाह्यमूल्यांकन केले. या मूल्यांकनात वाडेगाव येथील जिल्हा परिषद मुलांची शाळेने बाजी मारली. आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा म्हणून संलग्नता देण्यास आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने मान्यता दिल्याचे पत्र मुख्याध्यापकांना बुधवारी प्राप्त झाले.
डिजिटल शाळेसोबत वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता देत, तेथील गुणवंत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भौतिक सुविधा, अभ्यासक्रम, प्रशिक्षित शिक्षक मिळावे, या दृष्टिकोनातून शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली. या मंडळाची संलग्नता देऊन आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा देण्यासाठी मंडळाने आॅनलाइन अर्ज मागविले होते. यात जिल्ह्यातील पाच शाळांची मंडळाने निवड केली. या पाच शाळांच्या बाह्यमूल्यांकनासाठी राज्यस्तरीय शाळा मूल्यांकन समितीच्या सहा सदस्यीय चमूने ४ ते ७ फेब्रुवारीदरम्यान पाच शाळांची तपासणी केली. तपासणीमध्ये वाडेगाव येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेने आंतरराष्ट्रीय शाळा संलग्नतेसाठी आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण केल्यामुळे या शाळेला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने पुढील तीन वर्षांपासून अस्थायी संलग्नता प्रदान केली आहे. त्यामुळे या शाळेला आता १० कोटी रुपयांचे अनुदान मिळेल आणि ग्रामीण भागातील मुलामुलींना आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार शिक्षण मिळणार आहे. आंतराष्ट्रीय मंडळाची संलग्नता मिळविण्यासाठी जि.प. सदस्य हिंमतराव घाटोळ, पं.स. सदस्य प्रशांत मानकर, शाळा समिती अध्यक्ष संतोष काळे, उपाध्यक्ष डॉ. चाँद यांच्यासह ग्रामस्थांचे मोठे सहकार्य मिळाले. (प्रतिनिधी)
 

शाळेत कॉन्व्हेंट सुरू होणार!
आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळाल्यामुळे वाडेगाव जि.प. शाळेत आता नर्सरी, केजी १, केजी २ पर्यंत कॉन्व्हेंट सुरू होईल. पहिल्या टप्प्यामध्ये नर्सरी ते इ. चौथीतील विद्यार्थ्यांना मंडळाच्या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार शिक्षण मिळणार आहे.

गतवर्षी जिल्ह्यातील एकाही शाळेला आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळाली नाही; परंतु यंदा ही संलग्नता मिळविण्यात यश मिळाले. मिळालेला बहुमान शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी तेथील शिक्षक, मुख्याध्यापकांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत.
-डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था


शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे परिश्रम आणि लोकसहभागामुळे शाळा डिजिटल झाली. आता शाळेला आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळाल्यामुळे शाळेमध्ये मंडळाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम शिकविला जाईल. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना मिळेल.
-समाधान सोर, मुख्याध्यापक
जिल्हा परिषद मराठी शाळा, वाडेगाव

 

Web Title: ZP School at Wadegaon has the status of international school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.