तीन सख्ख्या भावांसह सहा जणांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 06:00 AM2019-11-03T06:00:00+5:302019-11-03T06:00:55+5:30

सय्यद मुशीर आलम नियाज अली (३५, रा. साबनपुरा) याची १ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ८.३० ते ९.३० च्या सुमारास धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. गांधी चौक ते जवाहर गेट रस्त्यावरील सावजी हॉटेलजवळ ही घटना घडली. या हत्याकांडामुळे शहरातील राजकारण तापले होते. महापालिकेतील आमसभाही या विषयाने गाजल्या होत्या.

- | तीन सख्ख्या भावांसह सहा जणांना जन्मठेप

तीन सख्ख्या भावांसह सहा जणांना जन्मठेप

Next
ठळक मुद्देमुशीर आलम हत्याकांड । अमरावती न्यायालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चार वर्षांपूर्वी शहरात गाजलेल्या मुशीर आलम हत्याकांडात तीन सख्ख्या भावांसह सहा जणांना जन्मठेप ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. २ राजेश तिवारी यांनी शनिवारी हा निर्णय दिला.
विधी सूत्रांनुसार, आजन्म कारावास ठोठावण्यात आलेल्या आरोपींमध्ये उमेश अशोक आठवले (२७), नीलेश अशोक आठवले (२४), दिनेश अशोक आठवले (३२, तिघेही रा. महाजनपुरा), राजेश गोविंद मांडवे (२५, कुंभारवाडा), शुभम तात्याराव जवंजाळ (१९, रा. कुंड खुर्द, ता. भातकुली) व अंकुश सुभाषराव जिरापुरे (२३, रा. खरकाडीपुरा) यांचा समावेश आहे.
सय्यद मुशीर आलम नियाज अली (३५, रा. साबनपुरा) याची १ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ८.३० ते ९.३० च्या सुमारास धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. गांधी चौक ते जवाहर गेट रस्त्यावरील सावजी हॉटेलजवळ ही घटना घडली. या हत्याकांडामुळे शहरातील राजकारण तापले होते. महापालिकेतील आमसभाही या विषयाने गाजल्या होत्या. शहर कोतवाली पोलिसांनी त्यावेळी सहा आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९ गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. प्रमुख सरकारी वकील परीक्षित गणोरकर, त्यांचे सहकारी दिलीप तिवारी, प्रशांत देशपांडे, शोएब खान, शब्बीर खान, मोहसीन मिर्झा यांनी युक्तिवाद केला. युक्तिवादाअंती न्या. राजेश तिवारी यांनी सर्व सहा आरोपींना आजन्म कारावास व दंड ठोठावला. उमेश आठवले व अन्य पाच आरोपींना कलम ३०२ व कलम ३०७ मध्ये दोषी ठरवून आजन्म कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कलम ३२४ अन्वये तीन वर्षे कारावास, पाच हजार रुपये दंड, कलम १४३ नुसार सहा महिने कारावास व दोन हजार रुपये दंड, कलम १४८ मध्ये तीन वर्षे कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. आर्म्स अ‍ॅक्टमध्ये सहाही आरोपींना निर्दोष ठरविण्यात आले. आरोपींच्यावतीने सी.व्ही. नवलानी, अ‍ॅड. तायडे, एस.आर. लोणे यांनी युक्तिवाद केला. ४ मार्च २०१६ रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी झाली. त्यानंतर सुनावणीदरम्यान १८ साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी विलास राजगुरे हा फितुर झाला.
आरोपींनी प्रतीक्षालयात कापला होता केक
सुनावणीदरम्यान न्यायालयीन प्रतीक्षालयात केक कापून आरोपी उमेश आठवलेचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. ५ आॅक्टोबर २०१८ रोजी दुपारच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची तक्रार पोलीसात करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपी उमेश आठवले, अंकुश जिरापुरेसह अन्य एकाला कारागृहातून न्यायालयात हजर करण्यासाठी आणले. सुनावणी सुरु असताना काही वेळाकरिता आरोपींना न्यायालयातील प्रतीक्षालयात बसविण्यात आले होते. शुक्रवारी उमेश आठवलेचा वाढदिवस असल्यामुळे त्याचे काही मित्र केक घेऊन प्रतीक्षालयात दाखल झाले. हातात हातकडी असलेल्या उमेश आठवले याने केक मित्रांनी उमेश आठवलेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हा सर्व प्रकार पोलिसांसमक्ष झाला.
न्यायालयाच्या प्रतीक्षालयात घडलेला हा प्रकार पाहून फिर्यादी पक्ष अचंबित झाला. या प्रकाराबाबत तन्वीर आलम यांनी तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली होती.
असा आहे घटनाक्रम
आरोपी उमेश आठवले हा १ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास जुना बसस्टँडनजीकच्या मराठा सावजी हॉटेलमध्ये जेवायला गेला. हॉटेलमालक सुरेश राजगुरे यांना त्याने जेवन वाढण्यास उशीर होत असल्याबाबत शिवीगाळ केली व तो निघून गेला. त्यानंतर लगेचच दोन ते तीन दुचाकीवर उमेशसह सहा जण तेथे आले. त्यांनी राजगुरेंवर सशस्त्र हल्ला चढविला. मुशीर आलम हा त्यावेळी बाजूलाच असलेल्या ट्रॅव्हल्सच्या दुकानात बसलेला होता. हल्ला परतवण्याच्या उद्देशाने मुशीरने हॉटेलकडे धाव घेतली. त्यावेळी उमेश आठवले व अन्य आरोपींनी मुशीर आलम, तनवीर आलम व बाबा उर्फ मशरुर आलम यांच्यावर तलवार, चाकूने वार केले. गंभीर जखमी मुशीरचा रात्री १ च्या सुमारास मृत्यू झाला. खुनाची ही घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या घटनेचा प्राथमिक तपास शहर कोतवालीचे तत्कालीन निरीक्षक सुरेश इंगळे यांनी केला, तर तत्कालीन ठाणेदार दिलीप पाटील यांनी आरोपपत्र दाखल केले.

Web Title: -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून