जियाउल्लासह महवीशची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 06:00 AM2019-11-21T06:00:00+5:302019-11-21T06:00:53+5:30
लालखडी स्थित मदरशात झालेल्या मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी मुख्य आरोपी जिया खानला अटक करून, त्याची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली. मात्र, त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा केले आहेत.
अमरावती : मदरशातील मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी जियाउल्ला खान व महवीश खान अहमद खान यांची न्यायालयाने बुधवारी ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. नागपुरी गेट पोलिसांनी जियाउल्ला खानची पंधरा दिवस पोलीस कोठडीत चौकशी केली. मात्र, गुन्ह्याची कबुली त्याने दिली नाही. जियाउल्लाची सहकारी फिरदौसजहाँची २२ नोव्हेंबर रोजी पोलीस कोठडी संपणार आहे.
लालखडी स्थित मदरशात झालेल्या मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी मुख्य आरोपी जिया खानला अटक करून, त्याची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली. मात्र, त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा केले आहेत. जियाउल्ला व महवीश यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर नागपुरी गेट पोलिसांनी दोघांनाही तगड्या बंदोबस्तात बुधवारी न्यायालयात आणले. तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालय (१) चे न्यायाधीश ए.व्ही. कुळकर्णी यांच्यापुढे त्यांना हजर केले. पोलिसांनी त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करून ४ डिसेंबरपर्यंत दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. जियाउल्ला खानकडून वकील परवेज खान व महवीश खानकडून वकील प्रशांत देशपांडे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
व्हॉइस रेकॉर्डिंगचे नमुने घेतले
जियाउल्ला खानच्या समर्थनार्थ मदरशातील मुलींचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या महवीशच्या आवाजाचे नमुने पोलिसांनी घेतले. त्या आवाजाची पडताळणीसाठी स्पेक्ट्रोग्राफी अॅनालिसीसद्वारे केला जाणार आहे. ते नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे.
पीडित मुलीचे कलम १६४ नुसार न्यायालयासमक्ष बयाण नोंदविण्यात आले आहे. महिला आरोपीच्या व्हाईस रेकॉडिंगचे नमुने घेण्यात आले असून, ते प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले.
- यशवंत सोळंके
पोलीस उपायुक्त.