अमरावती विभाग ‘पदवीधर’ निवडणुकीत १.८६ लाख मतदार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 08:01 PM2022-12-30T20:01:15+5:302022-12-30T20:01:19+5:30

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अंतिम मतदार यादी जाहीर केली.

1 86 lakh voters in Amravati division 'Gradvidhar' election | अमरावती विभाग ‘पदवीधर’ निवडणुकीत १.८६ लाख मतदार

अमरावती विभाग ‘पदवीधर’ निवडणुकीत १.८६ लाख मतदार

Next

गजानन मोहोड

अमरावती :

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अंतिम मतदार यादी जाहीर केली. यामध्ये १,८६ ३६० मतदारांचा समावेश आहे. प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत ६०,४३६ ने वाढ, तर सन २०१७ च्या तुलनेत सद्यस्थितीत २४,१५१ ने मतदार संख्या कमी झाल्याचे दिसून येते.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील आमदारांचा कालावधी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी समाप्त होत आहे. त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाद्वारा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे विभागातील पाचही जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झालेली आहे. ती २ फेब्रुवारी दिवशी मतमोजणी संपेपर्यंत सुरू राहणार आहे.

पदवीधर मतदारसंघात दर सहा वर्षांत किमान १० टक्के मतदारसंख्या वाढ गृहीत धरण्यात येते. यामध्ये काही मतदार मृतदेखील होतात. त्यानुसार यावेळेस किमान २.३५ ते २.४० लाखांचे दरम्यान मतदारसंख्या राहील, अशी निवडणूक विभागाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ती संख्यादेखील पार झालेली नसल्याने यावेळी पदवीधरांमध्ये असलेला अनुत्साह चर्चील्या जात आहे. या मतदारसंघासाठी प्रत्येक वेळी नव्याने मतदार यादी तयार केली जाते. त्यानुसार निवडणूक विभागाने प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती केली होती.

मतदारसंख्येत होणार वाढ
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त ५ जानेवारीला अधिसूचना प्रसिद्ध करतील. त्यापूर्वी नोंदणी झालेले मतदार या यादीमध्ये राहणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. याशिवाय उमेदवारी अर्ज प्रक्रियेपर्यंत मतदार नोंदणी करू शकतात. मात्र, मतदार यादीत नाव येण्यासाठी अंतिम दिनाचे पाच दिवसांपूर्वी नोंदणी आवश्यक आहे.

विभागात आचारसंहिता लागू
आयोगाद्वारा २९ डिसेंबरला ‘पदवीधर’साठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर विभागातील पाचही जिल्ह्यात आचारसंहितेचा अंमल सुरू झालेला आहे. त्यामुळे मतदारांवर प्रभाग करणारी कोणतीही कृती करता येणार नाही. दोन महिन्यांपासून सुरू असलेली ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता २० डिसेंबरला संपुष्टात आल्यानंतर आठ दिवसांत पुन्हा ‘पदवीधर’साठी लागू झालेली आहे.

Web Title: 1 86 lakh voters in Amravati division 'Gradvidhar' election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.