१,९६३ गावांची नजरअंदाज ७० पैसेवारी
By admin | Published: October 4, 2016 12:18 AM2016-10-04T00:18:22+5:302016-10-04T00:18:22+5:30
जिल्ह्यात ७ आॅगस्टपासून ३५ दिवस पावसात खंड असल्याने हलक्या व मध्यम जमिनीतील सोयाबीन करपले,
उफराटा न्याय : सोयाबीन बाधित, उडीद, कपाशीचेही नुकसान
अमरावती : जिल्ह्यात ७ आॅगस्टपासून ३५ दिवस पावसात खंड असल्याने हलक्या व मध्यम जमिनीतील सोयाबीन करपले, अती पावसाने तूर जळाली व आता दोन आठवड्यांपासून परतीच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगात कोंब निघत आहेत. कपाशीची पानगळ होत असताना जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ७० पैसे जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. यामुळे शेतकरी वर्गात चीड व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा १२० टक्के पाऊस पडला. १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान ८१४ मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ९७७.१ मि.मी.पाऊस पडला. पेरणीपासून समाधानकारक पाऊस असल्याने पिके चांगली होती. मात्र सततच्या पावसामुळे जमिनीतील आर्द्रता वाढून हजारो एकरांतील तुरीवर आकस्मिक मर येऊन तूर जागीच जळाली.
७ आॅगस्टपासून पावसात खंड असल्याने हलक्या व मध्यम स्वरुपाच्या जमिनीतील सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. हे सोयाबीन करपले, दाना बारीक होऊन शेंगा पोचट राहिल्या.
आता सोयाबीन कापनीवर आले असताना गेल्या १५ दिवसांपासून परतीचा पाऊस होत आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव, वातावरणात व जमिनीत वाढलेली आर्द्रता यामुळे परिपक्व झालेल्या सोयाबीनच्या शेंगांमधून दाने अंकुरात आहे. तसेच उडदाच्या गंजीमध्येही दाण्यांना कोंब फुटले आहे. अति पावसामुळे बीटी कपाशीची पातेगळ होत आहे. यामुळे यंदाच्या खरीप हंगामात सरासरी उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमिवर ३० सप्टेंबरला जिल्हा प्रशासनाने १ हजार ९६३ गावांची नजरअंदाज पैसेवारी ही ७० पैसे जाहीर केल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी शासकीय मदत मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी)