१ लाखावर नागरिकांची तहान भागविली जातेय टॅंकर, विहिरीवर
By जितेंद्र दखने | Published: June 17, 2023 04:12 PM2023-06-17T16:12:29+5:302023-06-17T16:12:42+5:30
पाणी समस्या : मेळघाटासह गैरआदिवासी भागातील ८८ गावात टंचाई
अमरावती: मेळघाटातील चिखलदरा,धारणी सह गैरआदिवासी भागातील ८८ गावात पिण्याच्या पाण्याचीटंचाई जाणवू लागली आहे. जून महिन्यातही या गावामधील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून ११ गावात १४ टॅंकरने तर ७७ गावांमध्ये ८४ विंधन विहीर व खासगी विहीरव्दारे १ लाख ०९ हजार ८०२ नागरिकांची तहान भागविली जात आहे.
यामध्ये १० हजार १२९ नागरिकांना १४ टॅकरव्दारे तर ७७ गावातील १ लाखावर नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील अनेक गाव आणि वाड्या वस्त्यांवर शासकीय टँकर पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात शासकीय आणि खाजगी टँकरचा समावेश आहे. ८८ गावात पाणी टंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा केला जात आहे. यात चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गावात तर चिखलदरा तालुक्यामधील १० गावात १४ टॅक़रने पाणी पुरवठा केला जात आहे. तर ११ तालुक्यातील २६ गावात विंधन विहीर तर ५८ खाजगी विहीरीव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे.
या गावात टॅंकरने पाणी पुरवठा
चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर,चिखलदरा मधील आकी,मोथा,खोंगडा,रायपूर,साेमवारखेडा,बगदरी,धरमडोह,खडीमल,एकझिरा,गौलखेडा बाजार आदी११ गावात टॅकरव्दारे तहान भागविली जात आहे.
तालुकानिहाय विहिर अधिग्रहाणाचे गावे
अमरावती ०९,नांदगाव खंडेश्र्वर १५,भातकुली ०१, तिवसा ०४,मोर्शी ०८,वरूड ०४,चांदूर रेल्वे १२,अचलपूर ०३,चिखलदरा १७,धारणी ०३,धामनगांव रेल्वे ०१ अशा १४ पैकी ११ तालुक्यातील ७७ गावात विहीर अधिग्रहणाव्दारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यातील मेळघाटसह ११ तालुक्यातील जवळपास ८८गावात पाणी टंचाई निवारणार्थ पाणी पुरवठा विभागाने १४ टॅकर व ८४ विहीरचे अधिग्रहन केलेले आहे.या माध्यमातून टंचाईग्रस्त गावांना सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे गतवर्षी पेक्षा यंदा टॅकरची संख्या बरीच घटली आहे.
संदीप देशमुख
कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग