नायलॉन मांजा विकणाऱ्यास १ लाखांचा दंड
By प्रदीप भाकरे | Published: January 12, 2023 08:40 PM2023-01-12T20:40:19+5:302023-01-12T20:44:50+5:30
महापालिका पथकाची बापटवाडीत कारवाईफोटो पी नायलॉन
अमरावती: एमपीसीबी कार्यालयाला खेटून असलेल्या बापटवाडी स्थित एका दुकानातून पाच रिळ प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. गुरूवारी सायंकाळी ६.३० ते ७ च्या सुमारास महापालिकेच्या पथकाने ही कारवाई केली. त्या दुकानदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र, दंडाची रक्कम भरण्यास संबंधित दुकानदाराने असमर्थता दाखविल्याने त्याच्याविरूध्द राजापेठ पोलिसांमध्ये फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली.
न्यायालयाच्या आदेशाने नायलॉन मांजा विक्री करणे आणि बाळगण्यावर बंदी आहे. तरीही नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाच्या जप्तीसाठी महापालिकेच्या पथकाकडून तपासणी केली जात आहे. महापालिकेने त्यासाठी सहायक आयुक्तांकडे झोननिहाय जबाबदारी दिली आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व झोनमधील साहाय्यक आयुक्तांना शहरातील पतंग विक्रेत्यांवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
झोननिहाय पथकासोबत स्वच्छता विभागाचे पथक देखील आहे. त्या पथकाने गुरूवारी सायंकाळी बापटवाडी भागात तपासणी केली असता, एका दुकानात नायलॉन मांजा लपवून विक्री होत असल्याचे आढळून आले. तेथून पाच रिळ नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. तर एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. मात्र त्या दुकानदाराने दंड भरण्यास नकार दिला. ती माहिती राजापेठ पोलिसांना देखील देण्यात आली. त्या दुकानदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कारवाईवेळी उपायुक्त डॉ. सीमा नैताम, सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले, जेष्ट स्वास्थ निरिक्षक विजय बुरे व पथक कर्मचारी व पोलीस उपस्थिय होते.