हृदयविकार शस्त्रक्रियेसाठी इर्विनमधून दहा बालके सावंगी मेघेला रवाना
By उज्वल भालेकर | Published: January 18, 2024 06:51 PM2024-01-18T18:51:20+5:302024-01-18T18:52:29+5:30
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या विविध आजारांचे वेळीच निदान करून आवश्यक शस्त्रक्रिया देखील केल्या जातात.
अमरावती : हृदयविकाराचा त्रास असलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील दहा बालकांना शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघे येथे पाठविण्यात आले आहे. मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णाल (इर्विन) येथून या बालकांना घेऊन रुग्णवाहिका रवाना झाली. या सर्व बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या विविध आजारांचे वेळीच निदान करून आवश्यक शस्त्रक्रिया देखील केल्या जातात. २ जानेवारी रोजी इर्विनमध्ये हृदयाचा त्रास असलेल्या ९४ बालकांचे टू-डी इको करण्यात आले होते. यामध्ये ३० बालकांच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. त्यामुळे या बालकांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय रुग्णालाय प्रशासनाने घेतला होता. त्याच अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या मार्गदर्शनामध्ये यातील पहिल्या टप्प्यात दहा बालकांना मोफत शस्त्रक्रियेसाठी मंगळवारी सावंगी मेघे येथे पाठविण्यात आले आहे.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रीती मोरे यांनी शस्त्रक्रियेसाठी बालकांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला हिरवी झेंडी दाखविली. यावेही निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. संदीप हेडाऊ, आरबीएसके पर्यवेक्षक नीलेश पुनसे तेसच रुग्णालयातील इतर अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते.