पाणी टंचाईसाठी १० कोटींचा आराखडा
By Admin | Published: January 19, 2016 12:12 AM2016-01-19T00:12:46+5:302016-01-19T00:12:46+5:30
यावर्षीही पावसाने दडी मारल्यामुळे उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही तालुक्यात पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेता...
प्रक्रिया पूर्ण : जिल्हाधिकारी देणार मंजुरी
अमरावती : यावर्षीही पावसाने दडी मारल्यामुळे उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही तालुक्यात पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ सुमारी १० कोटी रूपयाचा कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. मंगळवारी कृती आराखडयास जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने यावर्षी तयार केलेल्या संभाव्य पाणी टंचाईच्या कृती आराखडयात जिल्ह्यातील ७०८ गावात ७३६ पाणी टंचाईच्या उपाय योजना प्रस्तावित केल्या आहे. यासाठी जवळपास १० कोटी रूपयाचा खर्च अपेक्षित आहे. दरवर्षी आॅक्टोंबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीत पाणी टंचाईच्या पहिल्या टप्यात जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली नाही. दुसऱ्या टप्यात जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीत जिल्ह्यातील ४०१ गावे व वाड्यांमध्ये मागणी नुसार पाणी टंचाईसाठी उपाय योजना प्रस्तावित करण्यात येणार आहेत. तर पाणी टंचाईच्या तिसऱ्या टप्यातील एप्रिल ते जून २०१६ या कालवधीत जिल्ह्यातील काही गावात तीव्र पाणी टंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने ३०७ गावात पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. संभाव्य कृती आराखडयात नवीन विंधन विहीर ३०७, नळ योजनांची विशेष दुरूस्ती १९१, तात्पुरत्या पूरक नळयोजना ५३, टँकर अथवा बैलजोडीने पाणी पुरवठा करणे १५ गावे, विहिरींचे अधिग्रहण करणे १७० यासोबतच वेळेवर उद्भवणाऱ्या परिस्थिती नुसार विहिंरीचे खोलीकरण, गाळ काढणे, विंधन विहिरींची दुरूस्ती आदी उपाययोजना करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणी टंचाईची कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पाणी टंचाईचा आराखडा अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी गित्ते यांची मंजुरात मिळताच त्यानुसार अंलबजावणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)