राज्यात वृक्ष लागवडीसाठी १० कोटी खड्डे तयार; सव्वा आठ कोटी खड्ड्यांचे छायाचित्र 'अपलोड'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 04:23 PM2018-05-29T16:23:16+5:302018-05-29T16:23:16+5:30
राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत सुमारे १० कोटी खड्डे तयार झाले असून, ८ कोटी ३० लाख ७ हजार ३५१ खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे. जून महिन्यापर्यंत १३ कोटी खड्डे तयार करून सविस्तर अहवाल पाठविण्याचे निर्देश शासनाचे आहेत.
- गणेश वासनिक
अमरावती : राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत सुमारे १० कोटी खड्डे तयार झाले असून, ८ कोटी ३० लाख ७ हजार ३५१ खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे. जून महिन्यापर्यंत १३ कोटी खड्डे तयार करून सविस्तर अहवाल पाठविण्याचे निर्देश शासनाचे आहेत.
राज्य सरकारने ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या धर्तीवर ‘वनयुक्त शिवार’ योजना हाती घेतली आहे. त्याअंतर्गत जुलै महिन्यात १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमासाठी कृतिआराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यात ३३ टक्के जमीन ही वृक्षाच्छादनाखाली आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरकस प्रयत्न चालविले आहे. मागील महिन्यात वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी १३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने विभागीय स्तरावर दौरे करून वस्तुस्थिती जाणून घेतली आहे. शासकीय, निमशासकीय व अन्य यंत्रणांना वृक्षलागवडीसाठी दिलेल्या बाबीकडे शासनाने बारकाईने लक्ष वेधले आहे. १ जुलैपासून होणारी वृक्ष लागवड ही ‘फोटोसेशन’ पुरती असू नये, यासाठी नियम, निकषाचा आधार घेतला जात आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरणाकडे वृक्षलागवड कार्यक्रमांची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली असून, जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून कामकाज हाताळतील, असे शासनादेश आहे. त्यामुळे येत्या जुलै महिन्यात १३ कोटी वृक्षलागवडीत वृक्षारोपणाचा दिखाऊपणा असणार नाही, त्याकरिता सर्वच यंत्रणांची ‘क्रॉस’ चेकींग सुरू झाली आहे. खड्डा खोदल्यानंतर त्याचे छायाचित्र ‘माय प्लँट अॅप’वर अपलोड केले जात आहे. त्यामुळे वृक्षारोपण आता कागदोपत्री राहणार नसून, रिझल्ट द्यावा लागत आहे.
२० कोटी रोपांची निर्मिती
१ ते ३१ जुलै या कालावधीत वृक्षलागवड कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यात सामाजिक वनीकरणांच्या २,१४२ नर्सरीत २० कोटी रोपांची निर्मिती झाल्याची माहिती पुणे येथील सामाजिक वनीकरणाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक दिनेश त्यागी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सामाजिक वनीकरणाच्या नियंत्रणात स्वतंत्रपणे ८५ हजार ८०६ स्थळे वृक्ष लागवडीसाठी तयार करण्यात आली आहे. २० कोटी रोपांपैकी १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास लवकरच ७ कोटी रोपांचे नियोजन केले जाईल, असे दिनेश त्यागी यांनी सांगितले.
१३ कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने कोणत्याही उणिवा असू नये, यासाठी शासनस्तरावरून दक्षता घेतली जात आहे. शासकीय, निमशासकीय व अन्य सामाजिक संघटनांना वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्रव्यवहार वजा आवाहन केले आहे.
- सुधीर मुनगंटीवार,
अर्थ व वनमंत्री, महाराष्ट्र