पोलीस वाहन, कार समोरासमोर भिडल्याने १० जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:13 AM2021-03-28T04:13:40+5:302021-03-28T04:13:40+5:30
वरूड : शेंदूरजनाघाट ठाण्यातून पोलीस वाहनातून बलात्कारप्रकरणातील आरोपी जिल्हा न्यायालयात नेत असताना, बारगावनजीक पोलीस वाहन आणि कार समोरासमोर भिडल्याने ...
वरूड : शेंदूरजनाघाट ठाण्यातून पोलीस वाहनातून बलात्कारप्रकरणातील आरोपी जिल्हा न्यायालयात नेत असताना, बारगावनजीक पोलीस वाहन आणि कार समोरासमोर भिडल्याने अपघात घडला. यामध्ये पोलीस वाहनातील ठाणेदार श्रीराम गेडामसह कर्मचारी आणि आरोपी असे पाच, तर कारमधील दोन महिलांसह पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार सकाळी साडेअकरा वाजता घडली. यातील एका होमगार्डला नागपूर पाठविण्यात आले, तर उर्वरित जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, ठाणेदार श्रीराम गेडाम (४९), कर्मचारी चंद्रकांत केंद्रे (४०), चालक अतुल मस्की (४१), होमगार्ड संतोष मरकाम (३५), नकुल सोनटक्के (३४, सर्व रा . शेंदूरजनाघाट) व आरोपी रोशन गंगाराम उईके (२२) अशी पोलीस वाहनातील जखमींची नावे आहेत. सुलताना बानो शेख अख्तर (४०), शमिनाबी बानो शेख बशीर (४६), शेख फरहान शेख आबिद (१२), दानिश खान हाफिज खान (१८), नावेद खान हमीद खान (२४, सर्व रा. पेठपुरा, मोर्शी) अशी कारमधील जखमींची नावे आहेत.
भादंविचे कलम ३७६ प्रकरणातील आरोपी रोशन गंगाराम उईके याला ११.३० वाजता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यास पोलीस वाहन (एमएच २७ एए ०६२९) ने घेऊन जात होते. बारगावनजीक कार (एमएच ०१ व्हीए ९५०३) ची समोरासमोर जोरदार धडक झाली. पोलीस वाहन रस्त्याच्या कडेला उलटून सरळ झाले. नागरिकांनी जखमींना बाहेर काढले. बेनोड्याचे ठाणेदार मिलिंद सरकटेसह पोलीस पथक रवाना होऊन सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी होमगार्ड संतोष मरकाम (३५) यांना पुढील उपचाराकरिता नागपूरला आणि ठाणेदार श्रीराम गेडाम यांना अमरावतीला रवाना करण्यात आले, तर आरोपी रोशन उईके याला अमरावती येथे पाठविण्यात आले. उर्वरित जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकरी कविता फडतरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी वरूडचे ठाणेदार प्रदीप चौगावकर, सहायक निरीक्षक हेमंत चौधरी, सुनील पाटील, बेनोडाचे ठाणेदार मिलिंद सरकटेसह तिन्ही पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली. वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरूच होती. घटनेचा तपास बेनोडा पोलीस करीत आहेत.