एका एकरात दहा लाखांचे टोमॅटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:11 AM2017-12-29T01:11:39+5:302017-12-29T01:13:37+5:30

पारंपरिक शेती न करता आधुनिक प्रयोगशील व बाजारपेठेतील शेतमालाच्या मागणीचा अभ्यास करून शेतीतून १०० दिवसांत एका एकरात १० लाखांपेक्षा अधिक टोमॅटोचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे.

 10 lakh tomatoes in one acre | एका एकरात दहा लाखांचे टोमॅटो

एका एकरात दहा लाखांचे टोमॅटो

Next
ठळक मुद्देविक्रमी उत्पादन : अतुल लकडे यांची यशोगाथा शेतकºयांसाठी प्रेरणादायी

लोकमत न्यूज नेटवर्क
अचलपूर : पारंपरिक शेती न करता आधुनिक प्रयोगशील व बाजारपेठेतील शेतमालाच्या मागणीचा अभ्यास करून शेतीतून १०० दिवसांत एका एकरात १० लाखांपेक्षा अधिक टोमॅटोचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. ही किमया अचलपूरच्या अब्बासपुरा येथील अतुल लकडे या शेतकऱ्याने साधली आहे.
अब्बासपुरा येथील युवा शेतकरी अतुल पुरुषोत्तमराव लकडे (३०) यांनी यावर्षी एका एकरात टोमॅटोची लागवड केली. साधारणत: जुलै महिन्यात टोमॅटो बियाणे आणून रोपे तयार करण्यात आली. यानंतर शेतात झिकझॅक पद्धतीने मल्चिंग टाकून ५ फूट बाय २ बेड अशा पद्धतीने साधारणत: दीड फूट अंतरावर दोन रोपांची लागवड केली. ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे व खताचे नियोजन केले. ५० टक्के रासायनिक व ५० टक्के सेंद्रिय पद्धतीची औषधे त्यांनी वापरली. सहा वेळा जीवामृत झाडांना दिले, तर पांढरी माशी, तुरतुडे यांचा बंदोबस्त करण्याकरिता ५० पिवळे ट्रॅप या टोमॅटोच्या शेतात बसविले होते.
एका एकरात लकडे यांना दोन हजार कॅरेट टोमॅटोचे उत्पादन झाले. परतवाडा, अंजनगाव या बाजारपेठेमध्ये या टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी होती. ६५० ते १५०० रूपये प्रति कॅरेट दर मिळाला.
आजही या टोमॅटोचे उत्पादन सुरूच आहे. बी-बियाण्यापासून तर मजुरी, फवारणी, खत, टोमॅटोचे झाडे बांधणे, फळे सोडणे, निंदण-खुरपण यासाठी एका एकरात सरासरी दोन लाख रुपये खर्च त्यांना आला. खर्च वजा करून अतुल लकडे यांना एका एकरात जवळपास १० लाखांचे उत्पन्न टोमॅटो पिकाने मिळवून दिले. त्यांच्या या यशाचे पंचक्रोशीत कौतुल होत असून, त्यांच्या शेतीला भेट देऊन मार्गदर्शन मागणाऱ्यांची संख्याही बरीच आहे.

Web Title:  10 lakh tomatoes in one acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.