सीमाभागातून गावठी दारूचा दहा लाखांचा साठा नष्ट; मध्य प्रदेश-मोर्शी पोलिसांची संयुक्त कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 12:13 PM2023-10-21T12:13:54+5:302023-10-21T12:14:05+5:30
३६ ड्रम मोहामाच, २५० लिटर दारू जप्त
मोर्शी (अमरावती) : महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमाभागात मोहाची अवैध दारू गाळणाऱ्या अड्ड्यांवर धाड टाकून मध्य प्रदेश व मोर्शी पोलिसांनी संयुक्त कारवाईत तब्बल १० लाखांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट केला. ही कारवाई शुक्रवारी दिवसभर चालली.
मोर्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हातभट्टीची दारू व बनावट देशी-विदेशी दारूची विक्री व तस्करी करणाऱ्या आरोपींविरुद्ध धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत मोर्शी तालुक्यासह मध्य प्रदेश हद्दीत दारू गाळणाऱ्या व विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर धाडी टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याचा सपाटा सुरू केला आहे.
शुक्रवारी सकाळी मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरखेड, सालबर्डी, भिवकुंडी तसेच मध्य प्रदेशातील आठनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झुनकारी, पाटनाका येथे धाड टाकण्यात आली. झुनकारी व पाटणाका येथे मोठमोठ्या झाडांचा आडोसा घेऊन सुरू असलेल्या सात ते आठ भट्ट्या यावेळी नष्ट करण्यात आला. येथून मोहा सडवा व गाळलेली २५० लिटर दारू असलेले एकूण ३६ मोठे ड्रम व इतर साहित्य असा एकूण ९ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जागीच नाश करण्यात आला. मात्र, आरोपींनी पोलिसांना पाहून पोबारा केला. या कारवाईत ठाणेदार श्रीराम लांबाडे यांच्यासह पोलिस चमू तसेच आठणेर पोलिस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
मध्य प्रदेशात गावठी दारू गाळण्याचा गोरखधंदा
मोर्शीहून पुढे मध्य प्रदेशात मोहाची गावठी दारू गाळण्याचा गोरखधंदा झपाट्याने सुरू आहे. त्या दारूची तस्करी मोर्शी शहरासह ग्रामीण भागात केली जाते. काही महिन्यांपूर्वी तरोडा धानोरा येथील अवैध विषारी मोहाची दारू पिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिस प्रशासन सतत दारूविरोधी कारवाया करीत आहे.