मोर्शीत शस्त्रसाठ्यासह १० लाखांचा ऐवज जप्त
By admin | Published: April 8, 2015 12:19 AM2015-04-08T00:19:12+5:302015-04-08T00:19:12+5:30
नवीन कारमधून शस्त्र आणि दारुची तस्करी करणाऱ्या आरोपीला १० लाखांच्या मुद्देमालासह मोर्शी पोलिसांनी अटक केली. ...
मोर्शी : नवीन कारमधून शस्त्र आणि दारुची तस्करी करणाऱ्या आरोपीला १० लाखांच्या मुद्देमालासह मोर्शी पोलिसांनी अटक केली.
नियाजखान वल्द नजीरखान (३५) असे आरोपीचे नाव असून तो शहरातील लक्ष्मीनगर परिसरात राहतो. तालुक्याला लागूनच संपूर्ण दारुबंदी असलेला वर्धा जिल्हा असून या जिल्ह्यात मोर्शी शहरातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या दारुची तस्करी केली जाते. येथील ठाणेदार निलिमा आरज यांना अशाच एका तस्करी करणाऱ्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन त्यांनी रात्रीला नाकेबंदी केली. रात्री दीड वाजताच्या सुमारास नवीन कोरी डस्टर कार त्यांनी थांबविली. तपासणी केली असता त्यात दोन पेट्या दारू आणि एकूण चार तलवारी आढळून आल्या. वाहन नियाजनखान वल्द नजीरखान या आरोपीचे असून तोच वाहन चालवीत होता. पोलिसांनी १० लक्ष रुपये किमतीच्या कारसह दारू आणि तलवारी मिळून १० लक्ष ८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपीला शस्त्रबंदी कायद्याच्या कलम ४/२५, दारुबंदी कायदा आणि मोटर व्हेईकल अॅक्टच्या विविध कलमाखाली अटक केली. आरोपीची दोन दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली असून दारुचा आणि तलवारींचा पुरवठादार आणि खरेदीदार इत्यादीचा तपास घेण्यात येत आहे. ठाणेदार नीलिमा आरज यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक पलांडे, हेकॉ शेंडे, श्याम चुंगडा, कुंदन, संदीप वंजारी यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
विशेष असे की, आरोपी अनेक वर्षांपासून तस्करीत गुंतलेला असून यापूर्वी त्याच्याकडील टाटासुमो वाहनातून ही तस्करी तो करीत होता. चार महिन्यांपूर्वी त्याने १४ लक्ष रुपये किमतीची नवीन डस्टर कार खरेदी केली. प्रादेशिक परीवहन कार्यालयाकडून नोंदणी झाल्यानंतरही क्रमांक वाहनावर टाकून घेतला नाही. वाहनाच्या आतील दिसू नये यासाठी संपूर्ण खिडक्यांवर सनस्क्रिन लावून घेतल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)