१० वाजता अधिकाऱ्यांची दालने रिकामीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:01:27+5:30
‘लोकमत’ची चमू गुरुवारी सकाळी १०.४५ वाजता महावितरण कार्यालयात पोहचली असता, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे त्यांच्या दालनात उपस्थित नव्हते. त्यांच्या दालनातील पंखा आणि चार दिवे सुरू होते. विजेचा अपव्यय होत होता. लगतच्या कार्यकारी अभियंता प्रतीक्षा शंभरकर यादेखील त्यांच्या दालनात उपस्थित नव्हत्या. पंखा आणि दिवे त्यांच्याही दालनात सुरू होते. अधीक्षक अभियंता अनिल वाकोडे यांच्या दालनात नव्हते.
संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लॉकडाऊनच्या काळात महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारीत मोठ्या प्रमणात वाढ झाली आहे. संवेदनशील काळात कर्तव्यावर वेळेत उपस्थित राहून तक्रारींचा निपटारा करणे, शिस्त लावणे हे ज्यांचे प्रमुख कर्तव्य आहे, तेच बड्या पगाराचे अधिकारी ११ वाजेर्पंत कार्यालयात पोहोचले नसल्याचे वास्तव 'लोकमत'च्या स्टिंग ऑपरेशनमधून गुरुवारी उघड झाले.
महावितरण कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६.१५ अशी आहे. अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता सकाळी १० च्या ठोक्याला कार्यालयात उपस्थित नव्हते. इतर अनेक अधिकाऱ्यांची स्थिती हीच होती.
वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याची बचत करा, असा संदेश देणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनातील पंखे, विजेचे दिवे मात्र, ते अनुपस्थित असतानाही सुरूच होते.
‘लोकमत’ची चमू गुरुवारी सकाळी १०.४५ वाजता महावितरण कार्यालयात पोहचली असता, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे त्यांच्या दालनात उपस्थित नव्हते. त्यांच्या दालनातील पंखा आणि चार दिवे सुरू होते. विजेचा अपव्यय होत होता. लगतच्या कार्यकारी अभियंता प्रतीक्षा शंभरकर यादेखील त्यांच्या दालनात उपस्थित नव्हत्या. पंखा आणि दिवे त्यांच्याही दालनात सुरू होते. अधीक्षक अभियंता अनिल वाकोडे यांच्या दालनात नव्हते. पंखा आणि दोन दिवे सुरू होते. उपकार्यकारी अभियंता पी.आर.अजमिरे त्यांच्या दालनात नव्हते. पंखा आणि एक दिवा सुरू होता. उपकार्यकारी अभियंता एस.ए. जयस्वाल त्यांच्या दालनात उपस्थित नव्हते. पंखा आणि दोन दिवे सुरू होते. इतर अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दालनातील स्थिती अशीच होती.
मुख्य अभियंता सुचित्रा गुजर त्यांच्या दालनात नव्हत्या. जनसंपर्क अधिकारी फुलसिंग राठोड यांनी त्या गुरुवारी रजेवर असल्याचे सांगितले.
दुपारी १.३० ते २ वाजेपर्यंतचा 'लंच टाईम' वगळता सकाळी १० ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत कर्तव्यावर हजर असणे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. परंतु दीड-दोन तासांपर्यंत अधिकारी कार्यालर्यात पोहोचत नसतील तर ग्राहकांची कामे होणार कशी? सकाळी कामांसाठी पोहोचणाऱ्यांना ताटकळत ठेवण्याचे अधिकार यांना आहेत काय? राज्य कुणाचे, जनेतेचे की अधिकाऱ्यांचे, असे प्रश्न उपस्थित होतात.
उशिरा येणार, दीड तास बसविणार
अधिकारी, कर्मचारी नेहमीच कार्यालयात उशिरा येत असल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अधिकारी उशिरा आल्यानंतरही त्यांना भेटावयाचे असेल तर सामान्य नागरिकांना अर्धा ते एक तासभर वेटींग रुममध्ये बसवून ठेवले जातात. चिठ्ठी आत गेल्याशिवाय कुणालाही परवानगी नसते. इच्छेप्रमाणे यायचे, सोयीनुसार भेटायचे, ही कार्यपद्धती अपेक्षित आहे काय?
भेटणाऱ्यांची नोंद, कर्मचाºयांची मात्र नाही!
महावितरणच्या मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता कार्यालयातील कामानिमित्य बाहेरून येणाºया प्रत्येक व्यक्तिची नोंद प्रवेशव्दारावरच रजीस्टरमध्ये घेण्यात येते. मात्र, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आगमनाची नोंद होत नाही. महावितरण कार्यालयातील बायोमेट्रीक मशीनसुद्धा बंद आहे. त्यामुळे कुणी किती तास कम केले याचा हिशेब कसा ठेवणार, कोण ठेवणार हा प्रश्न उपस्थित होतो.
मी रजेवर आहे. कार्यालयात पुन्हा उपस्थित झाल्यानंतर कोण-कोण अनुपस्थित होते, त्याची चौकशी करण्यात येईल.
- सुचित्रा गुजर,
मुख्य अभियंता,महावितरण