महापालिकेत १० टक्के अनुकंपा भरतीला मंजुरी
By admin | Published: January 10, 2015 10:46 PM2015-01-10T22:46:27+5:302015-01-10T22:46:27+5:30
महापालिकेचा कारभार प्रभारींच्या भरवशावर सुरु असताना आता शासनाने १० टक्के अनुकंपा भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी रिक्त पदांच्या तुलनेत २० पात्र
अमरावती : महापालिकेचा कारभार प्रभारींच्या भरवशावर सुरु असताना आता शासनाने १० टक्के अनुकंपा भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी रिक्त पदांच्या तुलनेत २० पात्र अनुकंपा धारकांना नोकरीत सामावून घेतले जाणार आहे. या कार्यवाहीला जवळपास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे संकेत आहे.
शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने अमरावती महापालिकेला १० टक्के अनुकंपा भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. आयुक्त अरुण डोंगरे, माजी महापौर विलास इंगोले यांच्या सततच्या पाठपुराव्याने अनुकंपाधारकांना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे, हे विशेष. महापालिकेत २०१२ ते २०१४ या दरम्यान १८५ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. यात वर्ग 'क' ते 'ड'चा समावेश असून सेवानिवृत्त रिक्त पदांच्या अनुषंगाने अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेण्याचे शासनाने निर्देशित केले आहे. प्रशासनाकडे २२ अनुकंपाधारकांची प्रकरणे सादर केली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २० पात्र अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेण्याची तयारी सुरु झाली आहे. अनुकंपाधारकांना न्याय मिळावा, यासाठी आयुक्तांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागप्रमुख मंगेश जाधव यांनी शासनाकडे भरती मंजुरीचा प्रस्ताव १७ मे २०१४ रोजी पाठविला होता. त्यानंतर ११ डिसेंबर २०१४ रोजी सुधारित प्रस्तावदेखील पाठविण्यात आला. या दोन्ही प्रस्तावांची शासनाने दखल घेतली असून विशेष बाब म्हणून महापालिकेला १० टक्के अनुकंपाधारकांच्या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे.
ही भरती प्रक्रिया राबविताना २०१२ या भरती वर्षांपासून गट 'क' व 'ड'मधील पदांच्या १० टक्के मर्यादेत नियुक्ती करण्याची कार्यवाही करावी, असा शासन निर्णय २५ जुलै २०१२ च्या प्रस्तावात दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आदेशित आहे. मागील काही वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपाधारकांना शासनाच्या नव्या आदेशाने न्याय मिळणार आहे.
ही भरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी आयुक्त अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त विनायक औगड, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख मंगेश जाधव, दिलीप पाठक हे करतील. (प्रतिनिधी)