कारागृहात १० बंदीजणांनी घेतला व्यसनमुक्तीचा ध्यास
By admin | Published: August 22, 2016 12:00 AM2016-08-22T00:00:02+5:302016-08-22T00:00:02+5:30
कारागृहात १० न्यायाधीन बंद्यांनी दारू, सिगारेट, विडी व तंबाखू न सेवन करण्याचा ध्यास घेतला आहे
संकल्प : कैद्यांचा स्वयंस्फूर्तीने पुढाकार
अमरावती : कारागृहात १० न्यायाधीन बंद्यांनी दारू, सिगारेट, विडी व तंबाखू न सेवन करण्याचा ध्यास घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी न्यायाधीन बंद्यांची बैठक घेतली असता स्वंयस्फूर्तीने १० कैदी व्यसनमुक्तीसाठी पुढे आलेत, हे विशेष.
कारागृहातील संत गाडगेबाबा प्रार्थना मंदिरात पार पडलेल्या न्यायाधीन बंदी सभेत कारागृहाचे नियम, जीवनक्रम, दिनचर्या आदींविषयी माहिती देण्यात आली. यावेळी कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी कैद्यांना व्यसनापासून होणारे नुकसान, भविष्यात होणारी हानी आदींवर मार्गदर्शन केले. कारागृह हे सुधारगृह असून येथे येणाऱ्या कैद्यांच्या मनात समाजाविषयी चांगली जाणीव निर्माण केली जाते.
व्यसनामुळे अनेकांचे आरोग्याचे नुकसान झाले आहे. त्यांच्या मुला-बाळांचे जीवन, शिक्षणाचे प्रश्न ऐरणीवर आले आहे. जीवन जगताना मृत्यू येणारच ही बाब सत्य असली तरी जे पदार्थ सेवन करून मृत्यू येणार हे उघडपणे दिसत असताना ते का टाळू नये, असा सवाल अधीक्षक ढोले यांनी कैद्यांच्या पुढ्यात ठेवला. कारागृहात विडी, सिगारेट, दारू, गांजा सेवन करणारे कैदी मोठ्या संख्येने बंदिस्त असतात, असे समाजात बोलले जाते. त्यामुळे समाजात नवा आदर्श घडवायचा असेल तर कैद्यांनी व्यसनमुक्त होऊन समाजात ताठ मानेने जगावे, असे ते म्हणाले. कारागृह अधीक्षकांच्या मार्गदर्शनाने १० कैद्यांचे मन परिवर्तन झाले. अन् क्षणात या १० कैद्यांनी व्यसनमुक्त होण्याचा ध्यास घेतला. यात मारोती तिडके, रवि बेलसरे, विशाल ढोके, शेख साबीर शेख हुसेन, मुकेश उईके, गोकुल उईके, शरद राठोड, विजय भालेराव, तुफानसिंग नरगाये, अशोक पटेल या न्यायाधीन कैद्यांचा समावेश आहे. कारागृहातील दहा न्यायाधीन बंदीबांधवांनी यासाठी स्वयंमस्फूर्तीने पुढाकार घेऊन हा संकल्प केल्याने एक नवा आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. व्यसनातून मुक्ती घेण्यासाठी कारागृहातील अधिकाऱ्यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)