टीईटी घोटाळ्यात अमरावती जिल्ह्यातील १० शिक्षक, अनुदानित-विनाअनुदानित शाळेतील गुरुजींचा समावेश
By जितेंद्र दखने | Published: August 23, 2022 04:28 PM2022-08-23T16:28:39+5:302022-08-23T16:35:22+5:30
राज्यभर टीईटी घोटाळा चांगलाच गाजला. काही दिवसांपूर्वी बोगस प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
अमरावती :शिक्षक पात्रता परीक्षेत टीईटी बोगस प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांमध्ये जिल्ह्यातील १० शिक्षक आढळून आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बोगस प्रमाणपत्र असलेल्या शिक्षकांवर कारवाई होणार असल्याने सहभागी शिक्षकांची झोप उडाली आहे.
राज्यभर टीईटी घोटाळा चांगलाच गाजला. काही दिवसांपूर्वी बोगस प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात समाविष्ट असलेल्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ७ हजार ८८० जणांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे उघड झाले आहे. यात अमरावती जिल्ह्यातील मराठी माध्यमाचे दोन आणि उर्दू माध्यमाच्या आठ शिक्षकांचा समावेश आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०१९-२० मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते.
५९ प्रमाणपत्रांची पडताळणी
टीईटी परीक्षा घोटाळ्यातील जाहीर झालेल्या बोगस शिक्षकांची यादी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाली. तत्पूर्वी वरिष्ठांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ५९ शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केले होते. यात जिल्हा परिषद, खासगी आणि नगरपरिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा समावेश होता.
ते दहा जण अनुदानित, विनाअनुदानित शाळांचे
बोगस प्रमाणपत्राच्या यादीत जिल्ह्यातील १० जण आढळून आले आहे. यात अनुदानित शाळेतील एक आणि विनाअनुदानित शाळेतील नऊ याप्रमाणे समावेश आहे. तर मराठी माध्यमाचे दोन आणि उर्दू माध्यमाचे आठ जण आहे. वरूड तालुक्यातील दोन, तिवसा एक आणि उर्वरित अमरावती तालुक्यातील असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. आता दोषी गुरूजींवर वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे कारवाई केली जाईल, असे शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले.