कोरोनामुळे पालक हिरावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 11:38 AM2021-07-03T11:38:24+5:302021-07-03T11:40:43+5:30
Amravati News कोरोनाने आई-वडील असे दोन्ही पालक हिरावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाने आई-वडील असे दोन्ही पालक हिरावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयामुळे गरीब, सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मानला जात आहे.
गतवर्षी मार्चपासून कोरोनाने कहर केला. अनेकांना जीव गमवावा लागला. यात काही कुटुंबातील कर्ते निघून गेले, तर काहींचे कोरोनाने आई-वडील असे दोन्ही पालक काळाच्या पडद्याआड गेले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसमोर शिक्षण, रोजगार, भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने त्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०२०-२१ या वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळणार आहे.
पाचही जिल्ह्यांतील माहिती गोळा करणार
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा व अमरावती या पाचही जिल्ह्यांमध्ये कोरोनाने आई-वडील असे दोन्ही पालक हिरावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. प्राचार्यांकडून माहिती मागविली जाणार आहे. त्याकरिता आरोग्य यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे.
आई-वडील असे दोन्ही पालक हिरावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी हा लाभ मिळणार आहे. प्राचार्यांना पत्र पाठवून अशा विद्यार्थ्यांची माहिती मागविण्यात आली आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ
कोरोनाने पालक हिरावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्यात आले.
- मनीष गवई, सिनेट सदस्य