प्लास्टिक पिशव्या खाल्ल्याने वर्षभरात शंभर गायींचा मृत्यू
By admin | Published: February 16, 2017 12:02 AM2017-02-16T00:02:58+5:302017-02-16T00:02:58+5:30
खाद्यपदार्थांसाठी प्लस्टिक पिशव्यांचा वापर सर्रास केला जातोय. उरलेले टाकाऊ खाद्यपदार्थ प्लस्टिकच्या कॅरिबॅगमध्ये टाकून फेकून दिल्या जाते.
नागरिकांची उदासिनता : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, बंदीनंतरही सर्रास वापर सुरूच
वैभव बाबरेकर अमरावती
खाद्यपदार्थांसाठी प्लस्टिक पिशव्यांचा वापर सर्रास केला जातोय. उरलेले टाकाऊ खाद्यपदार्थ प्लस्टिकच्या कॅरिबॅगमध्ये टाकून फेकून दिल्या जाते. पिशव्यांसह ते खाद्यपदार्थ जनावरांच्या पोटात जातात. परिणामी काही दिवसानंतर ती जनावरे दगावतात. अवघ्या वर्षभरात एक-दोन नव्हे तर शंभरावर गार्इंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याने प्लास्टिक पिशव्यांचा वापर किती घातक आहे, हे स्पष्ट होते. हाप्रकार कसा थांबेल, याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना जनावरांवर होणाऱ्या त्यांच्या दुष्परिणामांचा विचार केला, तर हे निष्पाप बळी थांबू शकतात.
शहरात एकीकडे जनावरांच्या कत्तलीचे प्रमाण वाढले असून ही बाब जनावरांच्या अवैध वाहतुकीमुळे सिद्ध होते. याकत्तलीमुळे दिवसेंदिवस गायींची संख्या सुद्धा घटल्याचे चित्र आहे. गायीला हिंदू धर्मात देवतेचा दर्जा आहे. गायींचा उपयोगही अनेक प्रकारे होते. त्यामुळे गायींचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी ठरते. मात्र पशूपालक गायींना चरण्यासाठी मोकाट सोडून देत असल्यामुळे त्या शहरातील उकिरड्यांवर अन्नाचा शोध घेत फिरतात. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या हुडकताना सुद्धा गायी दिसून येतात. कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात निरूपयोगी प्लास्टिक पिशव्या टाकलेल्या असतात. या पिशव्या अनवधानाने गायींच्या पोटात जातात. त्यामुळे पशुंना पोटाचे विकार जडतात. या प्लास्टिक पिशव्या पोटाबाहेर काढण्याखेरिज अन्य पर्याय उरत नाही.
अनेकदा पशूवैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रियेद्वारे गार्इंच्या पोटातील पिशव्यांचे गोळे बाहेर काढतात. मात्र, शस्त्रक्रिया करताना गार्इंच्या जीवाला मोठा धोका असतो. अशावेळी जनावरे दगावण्याची शक्यता असते. बहुतांश गायी प्लस्टिक पिशव्या पोटात साचल्याने दगावतात. शहरातील गोरक्षणांमध्ये अशा कित्येक गायी पोटाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. मोकाट जनावरांना पकडून गौरक्षणातील कोंडवाड्यात ठेवण्यात येते. यापैकी अनेक गार्इंच्या पोटात प्लास्टिक पिशव्या असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. दस्तुरनगरातील गौरक्षणामध्ये वर्षभरात तब्बल शंभरावर गायींचा मृत्यू केवळ प्लस्टिक पिशव्या खाल्ल्याने झाल्याचे संस्था सचिव किशोर गोयनका यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त आर.एस.पेठे यांनीही या प्रकाराबाबत पृष्टी केली आहे. हा एकूणच प्रकार घातक आहे.
पशुपालकांसह नागरिकांचीही जबाबदारी
पशुपालकांनी त्यांच्या मालकीच्या जनावरांना चारा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जनावरांना मोकाट सोडू नये, त्याचप्रमाणे नागरिकांनी, विशेषत्वे गृहिणींनी अन्न व खाद्यपदार्थ बाहेर टाकताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये, अडीअडचणीत कागदांचा वापर करावा. भाजीपाला किंवा खाद्यपदार्थ कचरा कुंडीतच टाकावे. ओला व सुका कचरा फेकताना वर्गिकरण करून कचरा कुंडीचाच वापर करावा. असे केल्यास निष्पाप प्राण्यांना मृत्युपासून वाचविता येऊ शकते. ही जबाबदारी पशुपालकांसह नागरिकांची सुद्धा आहे.
सामाजिक संघटना केव्हा देणार लक्ष
पशु पालक गायीने खाद्य न देता त्यांना चराईसाठी मोकाट सोडतात. त्यामुळे गायीच्या खाण्यामध्ये प्लस्टिकच्या पिशव्या येतात. ही बाब महापालिका प्रशासनाला माहिती आहे. मात्र, तेथील यंत्रणा केवळ मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात ठेवतात. मात्र, प्लस्टिकच्या पिशव्यांमुळे गायींच्या मृत्यू होत असताना त्याची दखल कोणी घेत नाही. त्यावर उपाययोजना किंवा निर्बंध लावण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे गायींचे बळी जाण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. याकडे सामाजिक संघटनांनी लक्ष वेधून जनजागृती व उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच शासनाकडे रेटा लाऊन या निष्पान जनावरांची जीव कसे वाचेल, याकडे लक्ष वेधले पाहिजे.
प्लास्टिक पिशव्या गार्इंना पचत नाही. त्यांचा गोळा तयार होतो. पिशवीला टाचणी किंवा पिन असेल तर इन्फेक्शन होते. त्यामुळे लवकरच गायीचा मृत्यू होतोे. महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी कठोर करावी. नागरिकांनीही सजगता बाळगावी.
- आर.एस.पेठे,
सहायक आयुक्त, पशुसंवर्धन.
गौरक्षण व कोंडवाड्यात दाखल होणाऱ्या बऱ्याचशा गार्इंना पोटाचे विकार जडले आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी झाल्यानंतर त्यांच्या पोटात प्लास्टिक पिशव्यांचा गोळा असल्याचे निदर्शनास येते. यापिशव्यांमुळे वर्षभरात शंभरावर गार्इंचा मृत्यू झाला.
- किशोर गोयनका,
सचिव, गौरक्षण संस्था