१०० विद्यार्थ्यांची अट अन्यथा मुख्याध्यापक कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2015 12:03 AM2015-09-02T00:03:34+5:302015-09-02T00:03:34+5:30
शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक संस्था, अतिरिक्त शिक्षक आणि वर्गखोल्या इत्यादीबाबत शासनाने नवे निकष लागू केले आहेत.
निर्णय : आरटीईनुसार होणार शिक्षण विभागाच्या नवीन निकषांची अंमलबजावणी
जितेंद्र दखने अमरावती
शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक संस्था, अतिरिक्त शिक्षक आणि वर्गखोल्या इत्यादीबाबत शासनाने नवे निकष लागू केले आहेत. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिवाच्या अहवालावर आधारित या निकषानुसार मुख्याध्यापकांचे पद मंजूर होण्यासाठी शाळेत १०० विद्यार्थी असणे बंधनकारक केले आहे. या निकषाचा परिणाम ग्रामीण आणि शहरी भागातील शाळांवर होणार आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संरचना निश्चित करणे नैसर्गिक वाढीने पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करणे, माध्यमिक शाळांना नवीन तुकड्या मंजूर करणे किंवा टिकवणे याबाबतच्या शासकीय आदेशांमध्ये संदिग्धता होती. ती दूर करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे राज्य शासनाने नवे निकष जाहीर केले आहेत. नव्या शासन निर्णयानुसार माध्यमिक स्वराज्य संस्थेच्या सर्व ग्रामीण आणि शहरी शाळांमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीचा वर्ग जोडण्यात यावा, नवीन वर्ग सुरू करण्यासाठी नव्या वर्गखोल्या बांधव्या लागत असल्यास शक्य तितक्या लवकर बांधल्या जाव्यात, असेही शालेय शिक्षण विभागाने या नवीन आदेशात म्हटले आहे. शाळांमध्ये वर्ग जोडल्यानंतर जेथे अतिरिक्त शिक्षक पद मंजूर करावे लागणार नाही. अशा शाळांचे प्रस्ताव शासनाकडे साद करावे लागणार आहेत. मुलांना अशासकीय शाळांमध्ये सामावून घेण्यासाठी अतिरिक्त शिक्षक पदासाठी प्रस्ताव मागविले जाणार आहेत.
विद्यार्थी संख्येच्या आधारावर शिक्षक संख्या
प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी मिळून ६० संख्येपर्यंत दोन शिक्षक तर त्यानंतरच्या प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांमागे एक अतिरिक्त शिक्षक मंजूर करण्यात येईल. मात्र, वेगळी वर्गखोली नसल्यास अतिरिक्त शिक्षकांच्या पदाला मंजुरी देता येणार नसल्याचे शासनाने म्हटले आहे. नवीन शाळेतील सहाव्या वर्गासाठी दोन शिक्षक नियुक्त करता येणार आहेत. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची संख्या १५१ पेक्षा अधिक असल्यास मुख्याध्यापकाचे पद राहणार आहे, तर १३५ पेक्षा विद्यार्थीसंख्या कमी झाल्यास तेथे मुख्याध्यापकाचे पद राहणार नसल्याचे शासन आदेशात म्हटले आहे. इतर सर्व शाळांमध्ये कमीत कमी १०० विद्यार्थी असतील तरच मुख्याध्यापकांचे पद दिले जाणार आहे.
इयता १ ते ५ पर्यंत १५१ व इयत्ता ६ ते ८ पर्यत १०० विद्यार्थी संख्या आवश्यक आहे. त्यामुळे मुख्याध्यापकाचे पद हे विद्यार्थी संख्येवर आधारित राहणार आहे. शिक्षण विभागाने नवीन धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
- पंडित पंडागळे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक.