१५२ पैकी १०१ विस्थापित शिक्षकांचे समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:29 AM2018-08-03T01:29:00+5:302018-08-03T01:29:57+5:30
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत १३१ शिक्षक विस्थापित झाले होते, तर २१ शिक्षकांनी बदलीचा अर्जच दाखल केला नाही. अशा एकूण १५२ शिक्षकांपैकी ५१ शिक्षकांनी न्यायालयातून ‘जैसे थे’चा आदेश मिळविला आहे. त्यामुळे २ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद प्रशासनाने १०१ शिक्षकांची समुपदेशनद्वारा पदस्थापना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत १३१ शिक्षक विस्थापित झाले होते, तर २१ शिक्षकांनी बदलीचा अर्जच दाखल केला नाही. अशा एकूण १५२ शिक्षकांपैकी ५१ शिक्षकांनी न्यायालयातून ‘जैसे थे’चा आदेश मिळविला आहे. त्यामुळे २ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद प्रशासनाने १०१ शिक्षकांची समुपदेशनद्वारा पदस्थापना दिली. यामध्ये २६ शिक्षकांना सपाटीवर, तर उर्वरित ७५ शिक्षकांना मेळघाटात नियुक्ती देण्यात आली.
जि.प. प्राथमिक शिक्षकांच्या प्रथमच राज्यस्तरावरून आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या. यामध्ये १३१ शिक्षक विस्थापित झाले, तर २१ शिक्षकांनी बदलीसाठी आॅनलाइन अर्जच दाखल केला नव्हता. त्यामुळे दोन्ही मिळून १५२ शिक्षकांना पदस्थापना देण्याचे नियोजन जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केले होते. अशातच १३१ विस्थापित शिक्षकांपैकी ५१ शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी व शासनाला दिले आहेत. गुरुवारी ८० विस्थापित व २१ अर्ज न भरलेले अशा १०१ शिक्षकांना समुपदेशनद्वारा पदस्थापना देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सीईओ मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण सभापती जयंत देशमुख, उपशिक्षणाधिकारी वामन बोलके यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण) व विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
अनेकांना मेळघाटात नियुक्ती
विस्थापित शिक्षकांच्या समुपदेशन प्रक्रियेत बहुतांश शिक्षकांना मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात रिक्त असलेल्या जागांवर पदस्थापना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विस्थापित शिक्षकांमध्ये पुरुषांपेक्षा महिला शिक्षकांचाच अधिक समावेश होता. आज घेण्यात आलेल्या विस्थापित शिक्षकांच्या समुपदेशन प्रक्रियेत ५१ शिक्षक वगळता, इतर शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्याचे सीईओ मनीषा खत्री यांनी सांगितले.