पोस्ट कोविड ‘म्युकरमायकोसिस’चे 101 रुग्ण, मृतांच्या संख्येत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 05:00 AM2021-05-23T05:00:00+5:302021-05-23T05:00:54+5:30
शहरातील फिजिशियन तसेच नाक-कान-घसा व नेत्र तज्ज्ञांकडे आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या किती रुग्णांनी उपचार घेतला, याची माहिती मागण्यात आल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खासगी डॉक्टरांकडून माहिती घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाद्वारे साप्ताहिक अहवाल केला जात आहे.
गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गातून बरे झालेल्या काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराचा सामना करावा लागत आहे. यात दोन ते तीन महिन्यांत शहरात १०१ रुग्णांची नोंद झाली असताना मृत रुग्णांच्या संख्येविषयी संभ्रम आहे.
‘म्युकरमायकोसिस’ वा काळ्या बुरशीच्या आजाराच्या यापूर्वी नाक-कान-घसा व नेत्र तज्ज्ञांकडे क्वचितच या रुग्णांची नोंद व्हायची. मात्र, कोरोना संसर्गात सहव्याधीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये या आजाराचे रुग्ण अधिक आहे. इर्विन रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी एक वाॅर्ड तयार करण्यात आला. या वाॅर्डात २० बेड असून, १० रुग्णांवर उपचार सुरू आहे.
जिल्ह्यात या आजाराचे नेमके किती रुग्ण आहेत. याविषयीची माहिती आरोग्य यंत्रणा ठामपणे सांगू शकत नाही. नाक-कान-घसा व नेत्र तज्ज्ञांनी मात्र किमान ५०० वर रुग्ण उपचार घेत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ला दिली.
खासगी डॉक्टरांना मागितला अहवाल
शहरातील फिजिशियन तसेच नाक-कान-घसा व नेत्र तज्ज्ञांकडे आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या किती रुग्णांनी उपचार घेतला, याची माहिती मागण्यात आल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खासगी डॉक्टरांकडून माहिती घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाद्वारे साप्ताहिक अहवाल केला जात आहे.
ॲम्फोटेरोसीन-बी इंजेक्शनचा तुटवडा
या आजारावर प्रभावी ‘ॲम्फोटेरोसीन-बी’ इंजेक्शनचा तुटवडा आहे. यावर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण राहणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
मृतांची संख्या पहिले ३१, नंतर निरंक
जिल्हा शल्यचिकित्सकांद्वारे म्युकरमायकोसिसच्या मृत रुग्णाबाबत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अहवालात जिल्ह्यात ३१ मृत दाखविण्यात आले. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी एक रुग्ण दगावल्याचे सांगितले. आरोग्य उपसंचालक राजकुमार चव्हाण यांनी सीएस कार्यालयाकडून आलेल्या मृतांच्या संख्येत घोळ असल्याचे सांगितले. मृतांची संख्या निरंक असल्याचे सीएस निकम यांनी सांगितले.
प्रशासनाची लगबग
दोन दिवसांपूर्वी नवाल यांनी या आजारासंदर्भात शहरातील खासगी डॉक्टरांची बैठक घेतली. याशिवाय शनिवारी डाॅक्टरांची कार्यशाळा झाली.