पोस्ट कोविड ‘म्युकरमायकोसिस’चे जिल्ह्यात १०१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:12 AM2021-05-23T04:12:47+5:302021-05-23T04:12:47+5:30

गजानन मोहोड अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर संसर्गानंतर बरे झालेल्या काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ या पोस्ट कोविड आजाराचा सामना ...

101 patients with post-covid mucorrhoea in the district | पोस्ट कोविड ‘म्युकरमायकोसिस’चे जिल्ह्यात १०१ रुग्ण

पोस्ट कोविड ‘म्युकरमायकोसिस’चे जिल्ह्यात १०१ रुग्ण

Next

गजानन मोहोड

अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर संसर्गानंतर बरे झालेल्या काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ या पोस्ट कोविड आजाराचा सामना करावा लागत आहे. यात दोन ते तीन महिन्यांत शहरात १०१ रुग्णांची नोंद झाली आहे.

‘म्युकरमायकोसिस’ वा काळ्या बुरशीच्या आजाराच्या यापूर्वी नाक-कान-घसा व नेत्र तज्ज्ञांकडे क्वचितच या रुग्णांची नोंद व्हायची. मात्र, कोरोना संसर्गात सहव्याधीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये या आजाराचे रुग्ण अधिक असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात एक महिन्यापूर्वी म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी एक वाॅर्ड तयार करण्यात आला. या वाॅर्डात २० बेड आहेत. येथे १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय शहरात अनेक रुग्णालयांत या आजाराचे रुग्ण दाखल आहेत.

जिल्हा प्रशासनाद्वारा चार दिवसांत या आजाराविषयी बैठकी व कार्यशाळा होत आहेत. मात्र, शहरात किंवा जिल्ह्यात या आजाराचे नेमके किती रुग्ण आहेत, याविषयीची माहिती आरोग्य यंत्रणा ठामपणे सांगू शकत नाही. नाक-कान-घसा व नेत्र तज्ज्ञांनी मात्र किमान ५०० वर रुग्ण उपचार घेत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ला दिली.

पाईंटर

म्युकरमायकोसिसची जिल्हा स्थिती

एकूण रुग्णसंख्या : १०१

उपचारानंतर बरे : ६६

मृत्यू झालेले रुग्ण : ००

उपचार सुरू रुग्ण : ३५

बॉक्स

जिल्हा प्रशासनाची आता लगबग

शासनस्तरावर या आजाराला गंभीरतेने घेण्यात आल्यानंतर आता कुठे जिल्हा प्रशासनाला जाग आलेली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या आजारासंदर्भात शहरातील खासगी डॉक्टरांची बैठक घेतली. याशिवाय शनिवारी डाॅक्टरांची कार्यशाळा झाली.

बॉक्स

खासगी डॉक्टरांना मागितला अहवाल

शहरातील फिजिशियन तसेच नाक-कान-घसा व नेत्र तज्ज्ञांकडे आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या किती रुग्णांनी उपचार घेतला, याविषयीची माहिती मागण्यात आल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खासगी डॉक्टरांकडून माहिती घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाद्वारे साप्ताहिक अहवाल केला जात आहे.

बॉक्स

ॲम्फोटेरोसीन-बी इंजेक्शनचा तुटवडा

जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढताच त्यावर प्रभावी असणाऱ्या ‘ॲम्फोटेरोसीन-बी’ इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. कुठल्याही मेडिकलमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध नाही. रेमेडिसिविरप्रमाणे या इंजेक्शनवर आता जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण राहणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

बॉक्स

मृतांची संख्या पहिले ३१, नंतर निरंक

जिल्हा शल्यचिकित्सकांद्वारे म्युकरमायकोसिसच्या मृत रुग्णाबाबत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अहवालात जिल्ह्यात ३१ मृत दाखविण्यात आले. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी एक रुग्ण दगावल्याचे सांगितले. आरोग्य उपसंचालक राजकुमार चव्हाण यांनीदेखील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून आलेल्या मृतांच्या संख्येत घोळ असल्याचे सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक निकम यांनी शनिवारी उशिरा दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीला मृतांची संख्या निरंक आहे.

कोट

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे १२५ वर रुग्ण असू शकतात. त्यापैकी एका रुग्णाचा झेनिथ हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

कोट

तांत्रिक चुकीमुळे आकडेवारीत चूक झाली होती. ती आता सुधारण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे १०१ रुग्ण व मृत्यू निरंक आहेत.

- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: 101 patients with post-covid mucorrhoea in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.