१०,२१२ शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:11 AM2020-12-29T04:11:02+5:302020-12-29T04:11:02+5:30
(असाईनमेंट) अमरावती : कृषी विभागांतर्गत विवध योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज आता भासणार नाही. या योजनांचा लाभ आता एकाच ...
(असाईनमेंट)
अमरावती : कृषी विभागांतर्गत विवध योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज आता भासणार नाही. या योजनांचा लाभ आता एकाच अजार्द्वारे घेता येणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या महाडीबीटी ( डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर) या थेट लाभार्थींना लाभ हस्तांतरणाच्या संकेत स्थळावर २८ डिसेंबरपर्यंत १० हजार २९२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.
नोंदणीसाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. आतापर्यंत या नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कृषी विभागाने सांगितले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना कृषी विभागामार्फत राबविल्या जातात. या प्रत्येक योजनेसाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करावा लागतो. त्यात वेळ जातो, शिवाय प्रत्यक्ष लाभ मिळायलाही विलंब लागतो. यासाठी कृषी विभागाने आता महाडीबीटी हे संकेतस्थळ ‘एनआयसी’च्या माध्यमातून विकसित केले आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करावा लागत आहे. काही ठिकाणी इंटरनेटच्या तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
अशी करावी नोंदणी
संकेत स्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा लागतो. शेतकरी स्वताचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतींमधील संग्राम केंद्र आदींच्या माध्यमातून संकेत स्थळावर जाऊन योजनेसाठी अर्ज करू शकतात. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक या संकेत स्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागतो.
कोट
अधिकाधिक सहभाग व्हावा
महाडीबीटी संकेतस्थळावरील नोंदणीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभत आहे. अशा पद्धतीची संगणकीय प्रणाली पहिल्यांदा वापरली जात आहे. यामुळे शेतकरी बांधवाचा त्रास कमी होऊन महाडीबीटीद्वारे योजनेचा थेट लाभ शेतकऱ्यांचा खात्यात जमा होणार आहे, सोडत पद्धतीने पारदर्शकताही आहे. ३१ डिसेंबर अंतिम मुदत असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.
विजय चवाळे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
कोट
नोंदणीचा कालावधी वाढवा
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ही नोंदणी आहे. काही भागात रेंज बरोबर मिळत नसल्याने तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेकदा वेगही राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रावर चकरा माराव्या लागतात. अनेक शेतकऱ्यांना याविषयीची माहितीच नसल्यामुळे ३१ डिसेंबरपूर्वी नोंदणी न झाल्यास त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखे होईल. त्यामुळे नोंदणीचा कालावधी वाढून देण्यात यावा.
भोजराज कावरे, शेतकरी, हिरापूर.
बॉक्स
या योजनांसाठी आता एकच अर्ज
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, बिरसा मुंडा कृषिक्रांती योजना, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आदी योजनांसाठी आता एकच अर्ज लागणार आहे.