१०४ कंत्राटी प्राध्यापकांची होणार भरती, केंद्रीय अनुदान आयोगाचे नियमावली लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 10:19 PM2019-07-01T22:19:43+5:302019-07-01T22:21:38+5:30
व्यवस्थापन परिषदेचा निर्णय : केंद्रीय अनुदान आयोगाचे नियमावली लागू
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठातील विविध शैक्षणिक पदव्युत्तर विभागात रिक्त असलेल्या कंत्राटी प्राध्यापकांच्या १०४ जागांकरिता पदभरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. सोमवारी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अनुदान आयोगाच्या निकष आणि नियमानुसार पदभरती केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक पार पडली. यावेळी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख, शिक्षण मंचचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप खेडकर आदी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठ प्रशासनाकडून कंत्राटी वजा ११ महिन्यांच्या ठरावीक कालावधीसाठी प्राध्यापकांच्या नियुक्तीचा विषय चर्चिला गेला. २४ हजार रुपये एकत्रित मानधनावर प्राध्यापकांची नियुक्ती करण्याबाबत निर्णय झाला. मात्र, प्राध्यापकांची नियुक्ती करतेवेळी यूजीसीच्या नियमानुसार ज्यांच्याकडे नेट-सेट, पीएच.डी पदवी असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. प्रसंगी पात्र उमेदवार मिळाले नाहीत, तर पदव्युत्तर पदवी आणि ५५ टक्के गुण असल्यास संबंधितांची नियुक्ती करण्यात येईल, असे ठरविण्यात आले.
यूजीसी, एआयसीटीई, एनसीटी या शिखर संस्थांनी ठरविलेल्या शैक्षणिक अटीनुसार प्राध्यापकांची भरती राबविली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट के ले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ अन्वये कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती करताना निवड समिती ठरवून दिली आहे. मात्र, नेट-सेट, पीएच.डी.ची अट वगळू नये, अशी मागणी दिनेश सूर्यवंशी, नीलेश गावंडे, प्रसाद वाडेगावकर या सदस्यांनी केल्याची माहिती आहे.
यूजीसीच्या नियमांनीच प्राध्यापक पदभरती होईल. या पदभरतीने प्राध्यापकांना न्याय मिळेल. मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबेल.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ