इमामनगरात १०५ घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 01:16 AM2019-06-24T01:16:34+5:302019-06-24T01:17:10+5:30
शनिवारी सायंकाळच्या वादळी पावसामुळे लालखडी परिसराजवळील इमामनगरातील १०५ घरांची पडझड झाल्याने रहिवासी नागरिकांचे मोठे नुकसान झाले. आ. रवि राणा, महापौर संजय नरवणे, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह महापालिकेच्या चमूने घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पंचनाम्याला प्रारंभ झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शनिवारी सायंकाळच्या वादळी पावसामुळे लालखडी परिसराजवळील इमामनगरातील १०५ घरांची पडझड झाल्याने रहिवासी नागरिकांचे मोठे नुकसान झाले. आ. रवि राणा, महापौर संजय नरवणे, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह महापालिकेच्या चमूने घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पंचनाम्याला प्रारंभ झाला. या पडझडीत इमामनगरातील एक रहिवासी तरुण जखमी झाला.
पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या वादळी वाºयामुळे शहरातील शेकडो झाडे कोसळली, तर अनेक ठिकाणी पडझड झाली होती. शनिवारी सायंकाळी पुन्हा वादळी वाºयासह आलेल्या पावसाचा इमामनगराला फटका बसला. शहरात इतरत्र नुकसान झाले नसल्याचे दिसून आले. वादळी पावसामुळे खुल्या जागेत वसलेल्या इमामनगरातील काही कच्च्या घरांचे बांधकाम कोसळले. काही घरांवरील टिनांचे छपरे उडाल्याने खळबळ उडाली. अनेकांचे संसार उघड्यावर आल्याने रात्रीच्या वेळेत नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यांनी कशीबशी रात्र काढली. मात्र, सकाळपासून प्रशासनाच्या मदतीच्या अपेक्षेत नागरिक होते.
महापौर संजय नरवणे, सभागृहनेता सुनील काळे, शिक्षण समिती सभापती गोपाल धर्माळे, नगरसेवक विजय वानखडे यांनी रविवारी इमामनगरात जाऊन पाहणी केली. तेथील १०५ घरांची पडझड झाली आहे. या घरांचा पंचनामा करण्याचे निर्देश त्यांनी दिले तसेच सानुग्रह निधी त्वरित वितरणाच्या सूचना यावेळी दिल्या. तहसीलदार संतोष काकडे, तलाठी बाहेकर, पाटेकर, धर्माळे, लांडगे उपस्थित होते. घटनेच्या माहितीवरून अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले होते.
बेघरांना पाच हजारांचे अनुदान
तहसील कार्यालयामार्फत इमामनगरातील रहिवाशांच्या नुकसानाचे निरीक्षण करण्यात आले. पडझड झालेल्या ८५ घरांचे पंचनामे रविवारी झाले. तेथील बेघरांना सानुग्रह अनुदान स्वरूपात प्रत्येकी पाच हजारांची मदत करण्यात आली. याशिवाय अंशत: व पूर्णत: बेघर झालेल्या नागरिकांच्या घरांचे मूल्याकंन महापालिकेकडून केल्यानंतर त्यांनासुद्धा मदत केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार संतोष काकडे ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आ. रवी राणा यांची भेट
इमामनगरातील घरांच्या पडझडीची माहिती मिळताच रविवारी आ. रवि राणा यांनी परिसरात जाऊन पाहणी केली. तेथील नागरिकांच्या नुकसानाविषयी माहिती जाणून घेतली. शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी रहिवाशांना दिले.