पीक विम्याच्या भरपाईसाठी कंपनीकडे १.०५ लाख अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:14 AM2021-09-22T04:14:47+5:302021-09-22T04:14:47+5:30
अमरावती : पश्चिम विदर्भात अतिवृष्टीमुळे २,२२,४१० हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. योजनेच्या नियमानुसार बाधित पिकांसाठी विमा संरक्षित ...
अमरावती : पश्चिम विदर्भात अतिवृष्टीमुळे २,२२,४१० हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. योजनेच्या नियमानुसार बाधित पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के प्रमाणात नुकसान भरपाई देय आहे. यासाठी विहित मुदतीत म्हणजेच नुकसान झाल्याचे ७२ तासांच्या आत १,०५,२५६ शेतकऱ्यांनी पूर्वसूचना अर्ज विमा कंपनीकडे सादर केले. अद्याप कंपनीद्वारा एकाही शेतकऱ्याला भरपाई देण्यात आलेली नाही.
यंदाच्या खरीप हंगामासाठी विभागातील १२,९९,७०७ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला. १०,२८,६३९ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केलेले आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २.२२ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचा कृषी व महसूल विभागाचा अहवाल आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीसाठी किमान २५ टक्के भरपाई देय आहे. याकरिता अमरावती जिल्ह्यात १४,७१०, अकोला ४९,७२४, बुलडाणा ८,७६३, वाशिम १२,२५९ व यवतमाळ जिल्ह्यात १९,७७० पूर्वसूचना अर्ज (इंटिमेशन) शासनाने सुचविलेल्या सहा पर्यायाच्या आधारे विमा कंपनीकडे दाखल केले आहे.
विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे माहितीनुसार आतापर्यंत पीक विमा कंपनीद्वारा ९०,३६२ अर्जाचे अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, यापैकी एकाही शेतकऱ्याला कंपनीद्वारा विमा संरक्षित रक्कम मिळाली नसल्याने कृषी विभाग करतो तरी काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
बॉक्स
नैसर्गिक अपत्तीमुळे ४१ तालुके बाधित
यंदाच्या पावसाळ्यात संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे अमरावती विभागातील ४१ तालुक्यातील ३५१ शहरे व ६,४३५ गावे व यामध्ये १९,९२९ कुटुंबे व ५०,८४१ नागरिक बाधित झालेले आहे. यामध्ये १५,२२२ हेक्टर शेती खरडून गेली तर २,२२,४१० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वाधिक १,२२,४५६ हेक्टर क्षेत्र अकोला जिल्ह्यात आहे. अमरावती ७७,४३४, यवतमाळ १८,६९९, बुलडाणा १,५७४ व वाशिम जिल्ह्यात २,२४४ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे.