१०५ अर्ज वैध, तिघे निवडणूक प्रक्रियेतून बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:18 AM2021-09-09T04:18:13+5:302021-09-09T04:18:13+5:30
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची निवडणूक येत्या ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी ३१ ऑगस्ट ते ...
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची निवडणूक येत्या ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान १८३ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले हाेते. या प्राप्त अर्जांची ७ सप्टेंबर रोजी छाननी करण्यात आली. यामध्ये १०५ अर्ज वैध ठरले, तर तिघांचे अर्ज बाद ठरले आहेत.
बँकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजताच सहकार क्षेत्रात रणधुमाळी सुरू झाली होती. बँकेच्या २१ संचालकपदांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीकरिता नामांंकन दाखल करण्याच्या मुदतीत १८३ जणांनी नामांकन दाखल केले होते. यात काही आमदारांसह सहकार क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता. या सर्व प्राप्त अर्जांची निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी छाननी करण्यात आली. या दरम्यान पाच जणांच्या नामांकन अर्जावर आक्षेप नोंदविण्यात आला होता. यावर ८ सप्टेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्णय दिला आहे. त्यानुसार पाचपैकी तिघांचे नामांकन अर्ज बाद ठरविले, तर १०५ नामांकन वैध ठरविले. आता २२ सप्टेंबरपर्यंत नामांकन अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत आहे. यादरम्यान यापैकी किती जण आपले नामांकन अर्ज मागे घेतात, याकडे सहकार क्षेत्रातील राजकीय मंडळीचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
यांचे नामांकन बाद
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून नामांकन दाखल केले होते. जयश्री राजेंद्र देशमुख यांनी महिला राखीव मतदारसंघातून नामांकन दाखल केले होते आणि इतर मागासवर्ग मतदारसंघातून नामांकन दाखल केले होते. अशाप्रकारे नामांकन अर्ज विविध कारणांमुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बाद ठरविले आहेत.