मेळघाटात साडेपाच वर्षांत १०६४ बालकांनी दम तोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 01:16 PM2024-11-25T13:16:28+5:302024-11-25T13:17:36+5:30
Amravati : कुपोषण रोखण्यासाठी विविध योजना मात्र शासनाला तरीही अपयश
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :मेळघाटातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु, या योजनेतून मेळघाटातील बालमृत्यू थांबविण्यात शासकीय यंत्रणेला अजूनही मेळघाट बालमृत्यू व मातामृत्यू मुक्त करता आलेला नाही. एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०२४ या साडेपाच वर्षाच्या कालावधीमध्ये मेळघाटमध्ये १ हजार ६४ बालकांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. त्याचबरोबर ३२ माता मृत्यूचीही नोंद करण्यात आली आहे.
शासनाकडून मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यामध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही कुपोषण रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु, तरीही मेळघाटातील बालमृत्यूचे चक्र थांबलेले नाही. आजही मेळघाटातील नागरिकांना आरोग्याच्या अपुऱ्या सोयी-सुविधा असल्याने अनेक गंभीर बालकांना अमरावती येथे जिल्हा स्त्री रुग्णालयात रेफर करण्याचे प्रमाण अधिक आहे. मेळघाटातील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे प्रत्येक वेळी आश्वासन मिळते. परंतु, प्रत्यक्षात उपाययोजना राबविली जात नसल्याचे सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे.
धारणी तालुक्यात सर्वाधिक बालमृत्यूची नोंद
मेळघाटातील धारणी तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे. तर चुरणी व चिखलदरा येथे ग्रामीण रुग्णालय आहेत. तर, मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणेनुसार, एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०२४ मध्ये नोंद झालेल्या बालमृत्यूमध्ये सर्वाधिक ७१९ मृत्यू हे धारणी तालुक्यात आहेत. तर, चिखलदरा तालुक्यात ३४५ बालकांच्या मृत्यूची नोंद आहे.
बालमृत्यू रोखण्यासाठी अशी आहे आरोग्य यंत्रणा
मेळघाटमध्ये धारणी व चिखलदरा असे दोन तालुके असून, एकूण ३२४ गाव आहेत. तर, येथील लोकसंख्या ही ३ लाख २४ हजार इतकी आहे. या ठिकाणी एक उपजिल्हा रुग्णालय, दोन ग्रामीण रुग्णालय, ११ प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य पथक ६, अॅलोपॅथी एक तर आयुर्वेदिक ४ दवाखाने, फिरते आरोग्य पथक ७, उपकेंद्र ९२, रुग्णवाहिका १०२ क्रमांकाच्या ३४ तर १०८ क्रमांकाच्या ९ या सोबतच २२ भरारी पथके आहेत. ती २४ बाय ७ सजग असतात.
मेळघाटातील वर्षनिहाय बालमृत्यूची नोंद
वर्ष धारणी चिखलदरा
२०१९-२० १७८ ६८
२०२०-२१ १४३ ७०
२०२१-२२ १२० ७५
२०२२-२३ १२५ ५०
२०२३-२४ १०३ ५३
२०२४ सप्टें. पर्यंत ५० २९
एकूण ७१९ ३४५