‘१०८’ अॅम्बुलन्स सेवा आता 'अॅप'वरही
By admin | Published: January 16, 2017 12:09 AM2017-01-16T00:09:46+5:302017-01-16T00:09:46+5:30
राज्याच्या इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसच्या ‘१०८’ या अॅम्बुलन्स सेवेसाठी आता मोबाईल 'अॅप' तयार करण्यात आले आहे.
रुग्णांना दिलासा : घटनास्थळी मिळणार लवकरात लवकर वैद्यकीय मदत
अमरावती : राज्याच्या इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसच्या ‘१०८’ या अॅम्बुलन्स सेवेसाठी आता मोबाईल 'अॅप' तयार करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत या अॅपवर केवळ एकच क्लिक केल्यास दहा सेकंदात अॅम्बुलन्स सर्व्हिसच्या कॉल सेंटरवर संदेश जाऊन काही वेळातच अॅम्बुलन्स घटनास्थळी वैद्यकीय मदतीसाठी हजर होणार आहे.
२६ जानेवारी २०१६ रोजी ही मोफत ‘१०८’ क्रमांकाची अॅम्बुलन्स सेवा सुरू केली आहे. या हेल्पलाइनवर फोन केल्यास काही वेळातच डॉक्टरसहित सुसज्ज अॅम्बुलन्स घटनास्थळी येते. आतापर्यंत या सेवेमुळे १२ लाख जणांचे प्राण वाचले आहेत. रस्ते अपघातापासून हार्ट अॅटॅक, प्रसूती, इमारत दुर्घटना, स्फोट अशा विविध आपत्कालीन परिस्थितीत ‘१०८’ अॅम्बुलन्स सेवा मदतीला धावून जाते. आता या अॅम्बुलन्स सेवेसाठी अॅप तयार करण्यात आले आहे.
या अॅम्बुलन्ससाठी फोन करणाऱ्या व्यक्तींना बहुतेकवेळा घटनास्थळाचा नेमका पत्ता सांगता येत नाही. त्यामुळे ते ठिकाण शोधून काढण्यात वेळ जाण्याची शक्यता असते. पण मोबाईल अॅपमुळे वैद्यकीय मदत नेमकी कोणत्या ठिकाणी हवी आहे, त्याची अचूक माहिती मिळते व अॅम्बुलन्स वेळेत घटनास्थळी पोहोचते. (प्रतिनिधी)
असे काम करणार 'अॅप'
गुगल प्ले स्टोअरवरून कोणत्याही अॅन्ड्रॉईड मोबाइलवर हे 'अॅप' डाऊनलोड करता येईल.
त्यासाठी संबंधित व्यक्तीचे नाव, ई-मेल, मोबाईल क्रमांक, वय आदी तपशील सादर करावा लागेल.
रुग्णाला कोणत्या स्वरुपाची वैद्यकीय मदत हवी त्याचा ‘आॅप्शन’ मोबाईल स्क्रीनवर येणार.
त्यावर क्लिक केल्यास दहा सेकंदांत मदतीचा संदेश हेल्पलाईनवर जाणार.
ही सेवा जीपीआरएसद्वारे जोडली असल्याने वैद्यकीय मदत मागणारी व्यक्ती कोणत्या भागात आहे. त्याची माहिती मिळेल. त्याआधारावर अॅम्बुलन्स घटनास्थळी पोहोचणार.
हे 'अॅप डाऊनलोड' केलेल्या व्यक्तीला जवळच्या नातेवाईकांचे किंवा मित्रांचे संपर्क क्रमांकही या सेवेकडे नोंदविण्याची सोय आहे.
आपत्कालीन परिस्थिती जवळच्या नातेवाईकांनाही माहिती देण्याची सोय यामध्ये आहे.