अमरावतीहून मुंबईला तस्करी होणारा १०८ किलो गांजा जप्त
By प्रदीप भाकरे | Published: October 7, 2023 05:08 PM2023-10-07T17:08:50+5:302023-10-07T17:09:10+5:30
सीपींच्या सीआययूची कार्यवाही : पीसीआरदरम्यान उघड होतील अनेक चेहरे, वाहनावर ‘प्रेस’
अमरावती : पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या सीआययू पथकाने एका कारमधून २१.६० लाख रुपये किमतीचा तब्बल १०८ किलो गांजा जप्त केला. गुन्ह्यात वापरलेली कार देखील जप्त करण्यात आली. अमरावती ते बडनेरा जुना बायपास मार्गावरील बगिया टी पॉईंटजवळ ही कार्यवाही करण्यात आली. ६ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास केलेल्या या कार्यवाहीदरम्यान एकाला अटक करण्यात आली. तर दुसरा आरोपी फरार झाला. रवि प्रेमचंद मारोडकर (४०, रा. नांदगाव खंडेश्वर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
अमरावती बडनेरा शहरातून तो गांजा मुंबईत जात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली. शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास सिआययू पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरिक्षक महेन्द्र इंगळे व पीएसआय गजानन राजमल्लू यांना अमरावती ते बडनेरा जुना बायपास मार्गावर एका कारमधून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकाच्या मदतीने जुना बायपासवर सापळा रचला असता रात्री १२ च्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची (क्रमांक एम. एच. ०२ डिजी २९११) कार बगिया टि पॉईन्टजवळ आली.
पोलिसांनी कारचा पाठलाग करून पाहणी केली असता त्यामध्ये मागच्या सिटवर मोठ्याप्रमाणात गांजा ठेवलेला दिसून आला. कारचालक रवि मारोडकर याला शनिवारी सकाळी पोलिसांनी त्याला अटक केली. तो गांजा अमरावतीहून मुंबईला घेवून जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्या गाडीवर मागे व पुढे प्रेस असे लिहलेले आढळले.
आरोपी दोन, एक अटक, दुसरा फरार
सहायक पोलीस निरिक्षक महेंद्र इंगळे यांच्यानुसार, गांजा जप्ती प्रकरणात एकुण दोन आरोपी निष्पन्न झाले. त्यातील एकाला अटक करण्यात आली. तर दुसरा आरोपी फरार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, आरोपी कारचालकाने तो गांजा येथून कुठून भरला, तो कुणाचा, मुंबईचा गांजा रिसिव्हर कोण, अशा विविध प्रश्नांचा उलगडा पोलीस कोठडीदरम्यान होण्याची शक्यता आहे. येथून मुंबईला गांजाची खेप पाठविणारा गांजा तस्कर कोण, त्याची उकल पोलीस करणार आहेत.
यांनी केली कार्यवाही
जप्त गांजाची किंमत २१ लाख ६० हजार व सात लाख रुपये किमतीची कार असा एकूण २८ लाख ६० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात बडनेरा पोलिसांत आरोपीविरुध्द एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई विशेष पथकातील अंमलदार सुनिल लासुरकर, विनय मोहोड, जहिर शेख, अतुल संभे, राहुल ढेंगेकर, विनोद काटकर यांनी केली आहे.