११९६ गावांत टंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 10:32 PM2017-12-20T22:32:13+5:302017-12-20T22:34:14+5:30
सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी पावसामुळे यंदा जिल्ह्यातील १,१९६ गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी पावसामुळे यंदा जिल्ह्यातील १,१९६ गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. यामध्ये १,४६३ उपाय योजनांवर जानेवारी ते जून २०१९ या कालावधीत १८ कोटी खर्च केले जाणार आहे. यंदा हजारांवर गावांत पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य जाणवणार, याची कल्पना असतानासुद्धा कृती आराखड्याला जिल्हा परिषदेने तब्बल दोन महिने दिरंगाई, यामुळे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रकार ठरला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात ८१४.५ मिमी सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्षात ५४८.१ मिमी पाऊस पडला. ही ६७ टक्केवारी आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाई जाणवणार, हे वास्तव जिल्हा परिषदेने गांभीर्याने घेतलेच नाही. निरीक्षण विहिरीतील पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने जिल्ह्यात ५०० वर गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचेल, याविषयीचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने गत महिन्यात जिल्हा प्रशासनाला सादर केला होता. यावर फारसे गांभीर्याने न घेतल्यामुळे यंदा पाणीटंचाईच्या कृती आराखड्याला तब्बल दोन महिने उशिरा झाला. जिल्ह्याधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांनी दोन पत्र दिल्यानंतर जिल्हा परिषदेला जाग आली, हे उल्लेखनीय.
जिल्हा प्रशासनाच्या आराखड्यानुसार जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत ७४२ गावांत ९०२ उपाययोजना करण्यात येईल. यावर ९ कोटी ९८ लाख ७४ हजारांना निधी खर्च होणार आहे तर एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत ४५४ गावांत ५६१ उपाययोजना प्रस्तावित आहेत, यावर ४ कोटी २ लाख ८० हजारांचा निधी खर्च होईल. जिल्हाधिकारी, सीईओ, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, ‘जीएसडीए’चे वरिष्ठ भूवैज्ञानिक आदींच्या संयुक्त नियोजनात हा आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये पाणीटंचाईला सुरूवात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील नियोजनात २४८ गावांत २९८, तर तिसºया टप्प्यातील १३२ गावांत १३४ नवीन विंधन विहिरी व कुपनलिका तयार करण्यात येणार आहे. यावर तीन कोटी २२ लाखांचा निधी खर्च होणार आहे.
जानेवारी ते मार्च दरम्यान ७४२ गावांना झळ
जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत १४७ गावांत नळ योजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. यावर ४ कोटी १० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. ७४ गावांमध्ये तात्पुरत्या पूरक नळ योजनांचा घेण्यात येणार आहे यावर यावर दोन कोटी १२ लाखांचा खर्च होणार आहे. ५८ विंधन विहिरींची दुरूस्ती, १४ गावंमध्ये टँकर, १५१ गावांमध्ये १७६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यावर एक कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
एप्रिल ते जून दरम्यान ४५४ गावांमध्ये टंचाई
एप्रिल ते जून या कालावधीत ६७ नळ योजनांची विशेष दुरूस्तीवर एक कोटी ८७ लाखांचा खर्च होणार आहे. ३ गावांमध्ये तात्पुरती नळ योजनेवर ९ लाख, १६ विंधन विहिंरीची दुरूस्ती, ३६ गावांत ३९ टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे, यावर १६ लाख, ९१ गावांत खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे, यावर ३१ लाखांचा खर्च होणार आहे. या अखेरच्या टप्प्यात ४५४ गावांत ५६१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. यावर ४ कोटींचा खर्च होणार आहे.