धोक्याची घंटा, जिल्ह्यात ११ कोरोनाबाधित रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 05:20 PM2021-12-31T17:20:20+5:302021-12-31T17:29:54+5:30
शुक्रवारी ९७९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता ११ संक्रमितांची नोंद झाली. ४८ तासांत २,२६१ नमुन्यांमध्ये झालेली २४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे.
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमण पुन्हा वाढू लागले आहे. शुक्रवारी ९७९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता ११ संक्रमितांची नोंद झाली. ४८ तासांत २,२६१ नमुन्यांमध्ये झालेली २४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९६,२४६ कोरोनाग्रस्त व ९४,६१२ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत.
फेब्रुवारी ते जूनदरम्यान कोरोनाची दुसरी लाट आली होती. या कालावधीत ७४ हजार पॉझिटिव्ह व १२०० नागरिकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर कोरोना संसर्गात कमी आलेली आहे. डिसेंबर महिन्यात ६७ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली तर संक्रमितांची मृत्यू नोंद निरंक आहे. चार महिन्यांत दुहेरी आकड्यामध्ये संक्रमितांची संख्या नोंद झालेली नव्हती. आता मात्र, डिसेंबरचे शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा संक्रमण वाढायला लागले आहे.
जिल्हा प्रशासनाद्वारा या आठवड्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. याशिवाय काही निर्बंध आणखी कठोर करण्यात आलेले आहेत. मात्र, कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी कुठेही होत नाही व याबाबत जिल्हा व मनपाच्या पथकाद्वारा कारवाई करण्यात येत नसल्याने नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने संसर्ग वाढत आहे.
क्वारंटाईन सेंटरसाठी मनपाची तयारी
तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरता महापालिकेद्वारा वलगाव येथील वृद्धाश्रम व विमवी केंद्र सुरू करण्याची शक्यता असल्याचे उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी सांगितले. या दोन्ही ठिकाणी किमान ५०० बेडची व्यवस्था आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या विलगीकरणाकरिता शहरातील हॉटेलचे प्रस्ताव मागण्यात आलेले असल्याचे वानखडे यांनी सांगितले.