११ शेतकऱ्यांनी परत केला अतिवृष्टीचा मदतनिधी
By admin | Published: January 28, 2015 11:07 PM2015-01-28T23:07:30+5:302015-01-28T23:07:30+5:30
अडीच वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे खरीप पीक नष्ट झाले होते. त्याची नुकसान भरपाई म्हणून ५०० रुपये शेतकऱ्यांच्या बँक
अमरावती : अडीच वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे खरीप पीक नष्ट झाले होते. त्याची नुकसान भरपाई म्हणून ५०० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जानेवारी २०१५ मध्ये जमा करण्यात आले. त्यामुळे दुष्काळातही शासनाला थट्टा सुचते, असा आरोप करीत ११ शेतकऱ्यांनी एकत्रितपणे ५ हजार ९०० रूपयांचा डी. डी. (धनादेश) शासनाला परत केला आहे.
४ ते ५ सप्टेंबर २०१२ रोजी अतिवृष्टी होऊन भातकुली तालुक्याताील पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी, तूर, मूग व उडीद पिकांचे प्रचंड नुकसान झाले.अतिवृष्टीमुळे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी संयुक्त पाहणी व पंचनामे केलेत. शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. अहवालही अधिकाऱ्यांना दिला. मदतनिधीची रक्कम पाहिल्यावर शेतकऱ्यांना धक्का बसला. शेतकऱ्यांना एकाच मापात तोलण्यात आलेले आहे. अतिवृष्टीच्या शासन मदतीच्या निकषापेक्षाही कितीतरी पटीने कमी केले आहे.
मदतीचा निकष कोणता, संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
नैसर्गिक आपत्तीमध्ये हेक्टरी ४५०० रूपयांची मदत मिळते. अतिवृष्टीदेखील नैसर्गिक आपत्तीच असल्याने प्रचलित निकषानुसार शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे. प्रत्यक्षात ३ ते ८ एकर शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५०० ते ६०० रूपयांची शासन मदत देण्यात आल्याने मदतीचा निकष कोणता, असा संतप्त शेतकऱ्यांचा सवाल आहे.