बस-तवेराची जबर धडक, भीषण अपघातात ११ ठार; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश
By गणेश वासनिक | Published: November 4, 2022 06:15 PM2022-11-04T18:15:26+5:302022-11-04T18:19:51+5:30
परतवाडा-बैतूल मार्गावरील घटना; अमरावती जिल्ह्यात आले होते पीक कापणीला, मेळघाटातून गावी परतताना झाला अपघात
परतवाडा (अमरावती) : गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता झालेल्या तवेरा व प्रवासी बस यांच्या अपघातात चारचाकी वाहनातील तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे. घटनेतील सर्व मृतक मध्यप्रदेश येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
परतवाडा- बैतूल या आंतरराष्ट्रीय महामार्गावरील जल्लार बुधगाव दरम्यान खासगी प्रवासी बस आणि तवेरा चारचाकी वाहनात भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण ११ जण ठार झाले असून एकाच परिवारातील पाच लोकांचा समावेश आहे. त्यात दोनच चिमुकले आहे. मेळघाट व त्याच्या सीमा रेषेवरील मध्यप्रदेशच्या आदिवासी पाड्यांमधून मोठ्या प्रमाणात आदिवासी कुटुंबे विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतातील पीक कापणीसाठी मागील दीड महिन्यापासून वास्तव्याला होते. पीक कापणीचे कामे आटोपत असल्याने दिवाळीपूर्वी अनेक कुटुंब आपले गावी गेले तर काही आता जात आहे. अशातच एका चारचाकी वाहनात रात्रीचा प्रवास ११ जणांच्या जीवावर बेतला आहे.
राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी केला शोक व्यक्त
परतवाडा- बैतूल मार्गावर झालेल्या या भीषण अपघातात मृतकाच्या परिवाराला प्रत्येकी दोन लक्ष रुपये देण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली असून या घटने संदर्भात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे
मृतात मध्य प्रदेशचे गरीब मजूर
गुरुवारी मध्यरात्री २ वाजता अपघात झाल्यानंतर पहाटे अपघातातील मृतके परतवाडा, मेळघाटच्या धारणी, चिखलदरा व इतर परिसरातील असल्याची चर्चा होती. मात्र, मध्य प्रदेश प्रशासनाने सर्व मृतक बैतूल व परिसरातील असल्याचे जाहीर केले आहे. मृतकाची ओळख पटविण्यासाठी पोलीस व प्रशासनाला मोठ्या प्रमाणात परिश्रम घ्यावे लागले
विरुद्ध दिशेने येताना झाला बस-चारचाकी भिडले
अमरावती जिल्ह्यातून शेतीचे कामे आटोपून जाणाऱ्या चारचाकी वाहन चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. त्यात झल्लार येथील एक, चिखलार व महाडगाव येथील प्रत्येकी पाच अशा एकूण ११ जणांचा मृत्यू झाला. त्यात अमर दुर्वे, मंगल सिंह विके, नंदकिशोर धुर्वे, श्यामराव धुर्वे, कली शामराव धुर्वे, किसन लीलाजी, कुसुम किसन धुर्वे, अनारकली केसा, संध्या केसा, विकास मधू आदी मृतकांची नाव आहेत