११ लाख मतदार निवडणार ४,८९६ सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:12 AM2020-12-22T04:12:18+5:302020-12-22T04:12:18+5:30

अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या ९९२ गावांतील ११ लाख ७ हजार २११ मतदार ४,८९६ सदस्यांच्या निवडीसाठी १५ जानेवारीला मतदान ...

11 lakh voters will elect 4,896 members | ११ लाख मतदार निवडणार ४,८९६ सदस्य

११ लाख मतदार निवडणार ४,८९६ सदस्य

Next

अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या ९९२ गावांतील ११ लाख ७ हजार २११ मतदार ४,८९६ सदस्यांच्या निवडीसाठी १५ जानेवारीला मतदान करणार आहेत. १,८२४ प्रभागांत हे घमासान होईल. यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन प्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक विभागाची कसरत सुरू आहे.

जिल्ह्यातील ६८ टक्के गावांत ऐन थंडीच्या दिवसांत सध्या निवडणुकीचा ज्वर चढला आहे. त्यात आता बुधवारपासून उमेदवारी अर्ज उचल व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने गावागावांतील गटागटांत सध्या चांगलीच लगबग सुरू झालेली आहे. या निवडणुकीत एकूण ५ लाख २१ हजार ५२८ स्त्री व ५ लाख ८५ हजार ६७५ पुरुष, तसेच इतर ८ असे एकूण ११ लाख ०७ हजार २११ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाची टक्केवारी अधिक राहत असल्याने संसर्ग काळात निवडणुकीला कुठेही गालबोट लागू नये, यासाठी प्रत्येक तालुक्याचा निवडणूक विभाग कामी लागलेला आहे.

या निवडणुकीसाठी ६७८ इमारतींमध्ये १,९५१ मतदान केंद्र राहणार आहेत. साधारणपणे एका केंद्राला १२०० मतदार जोडले असतात. परंतु मतदानाच्या वेळी गर्दी होऊ नये व फिजिकल डिस्टन्स कायम राहावे, यासाठी यावेळी प्रत्येक मतदान केंद्राला फक्त ७०० ते ८०० मतदार जोडले जाणार आहेत. त्यामुळे मतदार केंद्राच्या संख्येत आणखीन भर पडणार आहे. ही सहाय्यकारी मतदान केंद्रे राहणार आहेत. याशिवाय संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्राची माहिती घेण्यात येत असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.

बॉक्स

उमेदवारी अर्जासाठी ऑनलाईन पद्धतीची सोय

* उमेदवारी अर्ज संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवाराने ते ऑनलाईन भरून त्याचे प्रिंट घेऊन संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचे आहे.

* प्रतिज्ञापत्रही संकेतस्थळावर ऑनलाईन भरून त्याची प्रिंट घेऊन आणि नोटरीकडे दृढकथन केल्यानंतर ते संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करता येणार आहे.

* उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीची संख्या मर्यादित असावी व उमेदवारी अर्ज भरताना वाहनांची व समर्थकांची गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

बॉक्स

मतदानापूर्वी हाताला सॅनिटायझर

मतदार नोंदणीवर स्वाक्षरी करण्यापूर्वी आणि मतदानासाठी ईव्हीएमचे बटन दाबण्यापूर्वी मतदाराच्या हाताला सॅनिटायझर लावण्यात येणार आहे. मतदारांचे वापरासाठी बुथमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करण्याचे निर्देश आहेत. फिजिकल डिस्टन्स राखण्यासाठी मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांसमोर केवळ एकच मतदार राहू शकणार आहे. मतदान केंद्रांत मतदान कर्मचारी व मतदान प्रतिनिधींची बौठक व्यवस्थेमध्ये फिजिकल डिस्टन्स राहील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

Web Title: 11 lakh voters will elect 4,896 members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.