चांदूर रेल्वे तालुक्यातील ११ जणांनी अनुभले मरण आपल्या डोळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:18 AM2021-09-10T04:18:18+5:302021-09-10T04:18:18+5:30
थरारक अनुभव, गळ्यापर्यंत पाणी अन कुटुंबाची आठवण, प्रताप अडसड ठरले देवदूत धामणगाव रेल्वे : अचानक आलेला पूर... त्यात जिवंत ...
थरारक अनुभव, गळ्यापर्यंत पाणी अन कुटुंबाची आठवण, प्रताप अडसड ठरले देवदूत
धामणगाव रेल्वे : अचानक आलेला पूर... त्यात जिवंत राहणार की नाही, याची शाश्वती नाही... पण कोणी तरी आपल्या मदतीला नक्की धावणार आहे, हे मनाशी ठरवून प्रत्येकाने आपले मित्रपरिवाराला फोन केले, संदेश दिले. अखेर खुद्द लोकप्रतिनिधीच मदतीला आले. चांदूर रेल्वे तालुक्यातील एकपाळा, पळसखेड, धानोरा म्हाली येथील ११ जणांनी आपल्या डोळ्यांनी स्वतःचे मरण अनुभवले नि थोडक्यात बचावलेदेखील.
चांदूर रेल्वे तालुक्यात दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसवामुळे नद्या फुगल्या. पाच वर्षांपासून तालुकावासीयांनी नदीला पूर पाहिला नव्हता. मात्र, अचानक या नद्या ओव्हर फ्लो झाल्या. धानोरा म्हाली-पळसखेड मार्गावर खोलाड नदी येते. या नदीला बुधवारी पूर आला. या पुरामुळे काठावर अडकलेल्या ग्रामस्थांना गावाकडे जाण्यासाठी मार्ग नव्हता. पूरपातळी वाढल्यास त्यांच्या जिवावर बेतण्याचीही शक्यता होती. त्यामुळे काही जणांनी आमदार प्रताप अडसड व सामाजिक कार्यकर्त्या अर्चना रोठे यांच्याशी बुधवारी सायंकाळी ७ वाजता संपर्क साधला. मतदारसंघात दौऱ्यावर असलेले आमदार अडसड यांनी पळसखेड परिसरात पोहोचून जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून त्वरित ही रेस्क्यू टीमला पाचारण केले आणि या पुरात अडकलेल्या तब्बल आठ प्रवाशांना प्रथम जीवदान दिले.
आ. अडसड ठरले देवदूत
खोलाड, रायगड व धानोरी या नद्यांचा एकपाळाजवळ त्रिवेणी संगम आहे. एकपाळा येथील विनोद काळमेघ, गणेश काळे, हरीश गोहत्रे हे श्रावणात ४० दिवस पुरातन महादेवाच्या मंदिरात मुक्कामी असतात. रात्री ११ वाजता अचानक त्रिवेणी संगम असलेल्या खोलाड नदीसोबतच रायगड आणि धानोरी नद्यांना पूर आला. त्यामुळे या मंदिरातून बाहेर पडणे तिघांना अशक्य झाले. विनोद काळमेघ यांनी आमदार प्रताप अडसड यांच्याशी संपर्क साधला. आमदार अडसड यांनी लगेच जिल्हाधिकारी पवनीत कौर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, पोलीस अधिकारी मेहेत्रे यांच्याशी संपर्क साधला तसेच स्वतः पुढाकार घेतला. रेस्क्यू टीमने या तीनही भाविकांना गुरुवारी पहाटे ६ वाजता बाहेर काढले. आठ तासांत पाण्याची पातळी वाढत जाऊन त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आले होते. मृत्यू प्रत्यक्ष दिसत असताना आ. अडसड यांच्या पाठपुराव्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
-------------
मागील चार ते पाच दिवसांपासून पाऊस संततधार होता. अशावेळी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य तसेच त्यांच्या संरक्षणाची काळजी घेणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. ते मी पार पाडले आहे.
- प्रताप अडसड, आमदार
धामणगाव विधानसभा मतदारसंघ