पश्चिम विदर्भात ११ तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा; नदीनाल्यांना पूर, पिकांचे नुकसान, घरांची पडझड
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: July 19, 2023 07:19 PM2023-07-19T19:19:11+5:302023-07-19T19:19:23+5:30
विभागात २४ तासांत ११ तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे.
अमरावती: विभागात २४ तासांत ११ तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन काठालगतची शेती खरडून पिकांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये अनेक घरांची पडझड झालेली आहे. अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात १०३.८ मिलिमीटर, यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यात ९७.३, मालेगाव १३७.३, झरी-जामणी ७३.८, केळापूर ८९.१ व राळेगाव तालुक्यात ९५.३ मिलिमीटर, बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यात ८४.५ मिलिमीटर, संग्रामपूर ७६.२, शेगाव ९१ व मलकापूर तालुक्यात ८१.१ मिलिमीटर तसेच वाशिम जिल्ह्यात मंगरूळपीर तालुक्यात ७८.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विभागात आतापर्यंत सरासरीच्या ८७.५ टक्के पावसाची नोंद झालेली आहे.
नांदुरा तालुक्यातील मामुलवाडी येथील एका वृद्धाचा मंदिराची भिंत पडल्याने मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. हातनूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे मलकापूर तालुक्यातील गावे प्रभावित होण्याची शक्यता असल्याने या धरणाचे ३० दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहेत. मलकापूर तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील पाच गावांचा संपर्क तुटलेला आहे. अकोला जिल्ह्यात चिखली व खरब ढोरे या गावांना पुराचा वेढा बसला आहे. प्रशासनाद्वारे प्रयत्न केला जात आहे.